सांगलीत परप्रांतीय तरुणाचं अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, गावातील तरुणांकडून हत्या
मृत कुंदन याने गावातील एका अल्पवयीन मुलीशई गैरवर्तन केले होते. त्याचा राग संशयितांना होता. त्यातूनच त्यांनी सोमवारी मध्यरात्री कवलापूर येथे कुंदनवर चाकूने हल्ला केला.
सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून एका परप्रांतियाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. कुंदन कुमार उराव (वय 23) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यातील चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत कुंदन याने गावातील एका अल्पवयीन मुलीशई गैरवर्तन केले होते. त्याचा राग संशयितांना होता. त्यातूनच त्यांनी सोमवारी मध्यरात्री कवलापूर येथे कुंदनवर चाकूने हल्ला केला. त्याच्यावर तीन वार करण्यात आले. छातीवरील घाव वर्मी बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
मृत कुंदन मुळचा जाफरगंज, बिहार येथील आहे. सध्या तो कवलापूरमध्ये राहत होता आणि जेसीबी ऑपरेटरचे काम करत होता. याठिकाणी राहत असणाऱ्या एका लहान मुलीसोबत कुंदन कुमार याने अश्लील चाळे केले होते. या रागातून चौघांनी मंगळवारी सकाळी कुंदन याचे अपहरण करत त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये कुंदन याच्या छातीवर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये शब्बीर शेख, अनिकेत पाटील, गणेश पाटील आणि विशाल माने या चौघा तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे.