मुंबई-पुणे रेल्वे मार्गाला पावसाचा फटका, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द
प्रगती, सिंहगड एक्सप्रेस, पुणे-पनवेल-पुणे या गाड्याची रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. वाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 29 आणि 30 जूनला या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पावसामुळे मुंबई-पुणे मार्ग काही ठिकाणी धोकादायक बनला आहे. रेल्वे मार्गावरील घाटात दरड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर धावणाऱ्या प्रगती, सिंहगड एक्सप्रेस, पुणे-पनवेल-पुणे या गाड्याची रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुणे ते भुसावळ नाशिक मार्गे येणारी गाडी दौंड-मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे.
मुंबई-पुणे दरम्यान एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने दोन्ही शहरातील प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरल्याने मुंबईवरुन पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे नागरकॉईल एक्स्प्रेस कर्जत स्थानकात उभी आहे.























