(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Missing School Bus : "उद्या दुपारपर्यंत झालेल्या निष्काळजीसंदर्भात खुलासा करा" , पोदार शाळेच्या व्यवस्थापनाला शिक्षण उपसंचालकांचे आदेश
Mumbai Missing School : सांताक्रूझ येथील पोदार शाळेत बस उशीरा आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना झालेल्या मानसिक त्रासाबाबत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.
Mumbai Missing School Bus : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी सांताक्रुझमधील पोद्दार शाळेची बस तब्बल पाच तासानंतर घरी पोहचली. आज झालेल्या या प्रकाराचा उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत खुलासा देऊन झालेल्या निष्काळजीपणा संदर्भात संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश, शिक्षण उपसंचालकांनी पोद्दार शाळेला दिले आहे.
सांताक्रुज पोदार शाळेत बस उशीरा आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना झालेल्या मानसिक त्रासाबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळेला पत्र लिहिले आहे. आज पोद्दार शाळेतील विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले नाहीत. विद्यार्थी घरी वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रचंड मानसिक त्रास झाला ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता बस सेवेचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते तसे न केल्याने पालकांना मानसिक त्रास झालेला आहे. घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थी सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट होत आहे. या निष्काळजीपणा बाबत संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी व संपूर्ण घटनेबाबत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत खुलासा सादर करावा अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी शाळेला दिले आहेत
शाळा सुटल्यानंतर पोदार बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण चार तासानंतरही विद्यार्थी घरी पोहचले नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली. या स्कूल बसच्या चालकाचा मोबाइल स्वीच ऑफ येत असल्याने पालक धास्तावले होते. 'एबीपी माझा'वर वृत्त प्रकाशित होताच मुंबई पोलीस अधिकऱ्यांनी ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती दिली. मात्र, या दरम्यान स्कूल बस नेमकी कुठं होती, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
संबंधित बातम्या :
School Bus Missing: स्कूल बस गेली कुठं? विद्यार्थ्यांसह बेपत्ता झालेली पोतदार शाळेची स्कूल बस सापडली; पोलिसांकडून तपास सुरू
School Bus Missing: ड्रायव्हरला रस्ता माहिती नसल्याने ती बस उशीरा पोहोचली; विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण