(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन, नंबर झळकणार
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरले नाही.
मुंबई : लालपरीचा प्रवास जितका आनंद देणारा, आठवणींनी भरुन जाणारा असतो तितकाच अनेकदा तो प्रवास तात्रदायकही ठरतो. कधी बस चालक आणि वाहनचालकांसोबत झालेल्या वादावादीतून संताप येतो, तर कधी बाजूच्या प्रवाशांसोबत झालेल्या कटकटीतून हा प्रवास नकोसा वाटतो. अनेकदा बस (Bus) प्रवासात बसची दूरवस्थाही आपल्या संतापाचे कारण ठरते. तर, काहीवेळा बसचा झालेला अपघात जीवावर बेतण्याची शक्यता असते. या सर्व अडचणींमध्ये बस प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करणे यात काहीही गैर नाही. त्यामुळेच, आता एसटीच्या (MSRTC) प्रवासात प्रवाशांना (Passenger) काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सांगावी, जेणेकरून त्याचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरले नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात. मात्र या तक्रार नेमकी कुठे कराव्यात, हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. यापूर्वी एसटी बसेस मध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला असायचा, परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले. त्यामुळे एसटीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी? हा एक मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर होता. त्यामुळे त्यांच्याच सूचनेवरून एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे किंवा तक्रारी चे निराकरण तातडीने व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान त्यांना एखाद्या अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणीत अथवा समस्येचे निवारण तातडीने करून घ्यावे.
बसवरच झळकणार आगारप्रमुखांचा नंबर
एसटी महामंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता बसमधील ड्रायव्हर सीटच्या पाठिमागील जागेवर जिथं काही सूचना लिहिलेल्या असतात, आता तिथं संबंधित बसच्या आगारप्रमुखांचा मोबाईल नंबर देण्यात येईल. त्यामुळे, प्रवाशांना प्रवासात काही अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांशी संवाद साधता येणार आहे.
हेही वाचा
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप