थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कट करण्याचा महावितरणचा निर्णय, मराठवाड्यातील शेतकरी संकटात
Beed News Update : मराठवाड्यातील थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन कट करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

Beed News Update : मराठवाड्यातील थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन कट करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मराठवाड्यातील साडे सहा लाख ग्राहकांकडे 1590 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या ग्राहकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा न केल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे महावितरणला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात गेल्या तीन वर्षापासून घरगुती, व्यापारी, औघोगिक व इतर 6 लाख 47 हजार 622 वीज ग्राहकांनी वीज बिन न भरल्याने 1590 कोटी 55 लाख 32 हजार रूपये थकीत आहेत.
थकबाकीच्या डोंगरामुळे थकबाकी व वीज चोरी जास्त असणाऱ्या फिडरवर भारनियमन करण्याची वेळ आली आहे. थकबाकीदार कोणीही असो त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश महावितरणने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज बिल वसूलीसाठी सर्व वर्गवारीतील ग्राहकांपर्यंत पोहचून पाठपुरावा करण्यासाठी महावितरणने हर घर दस्तक उपक्रम, एक गाव एक दिवस उपक्रम, एक वार्ड एक दिवस उपक्रमासह मार्च महिन्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. वसूलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी जावून बिल भरल्याची पडताळणी करून बिले भरून घेणे, सतत पाठपुरावा करणे, वीज बील दुरूस्ती व बिले भरण्यासाठी मेळावे घेणे, प्रचार, प्रसिध्दी व विविध माध्यमातून जनजागृतीकरणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जनजागृती करूनही औरंगाबाद परिमंडलात सर्व वर्गवारीतील 2 लाख 32 हजार 754 वीज ग्राहकांनी 3 वर्षापासून 534 कोटी 83 लाख 73 हजार रूपये थकविले आहे. लातूर परिमंडलात सर्व वर्गवारीतील 2 लाख 33 हजार 73 वीज ग्राहकांनी 3 वर्षापासून 552 कोटी 56 लाख 46 हजार रूपये थकविले आहे. नांदेड परिमंडलात सर्व वर्गवारीतील 1 लाख 81 हजार 795 वीज ग्राहकांनी 3 वर्षापासून 503 कोटी 15 लाख 14 हजार रूपये थकविले आहे. त्यामुळे ठवाड्यात गेल्या तीन वर्षापासून सर्व वर्गवारीतील 6 लाख 47 हजार 622 वीज ग्राहकांनी एकही रूपया न भरल्याने 1590 कोटी 55 लाख 32 हजार रुपये वीज बील थकीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
