MSBSHSE SSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात, जाणून घ्या परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
Maharashtra SSC Exam : उद्यापासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. उद्या पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करता दृष्टिकोनातून दहावी परीक्षेचे वेळापत्रक तयार करत असताना महत्त्वाच्या बहुतांश विषयाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे
कोव्हिड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाइन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाचे उपाय योजना करण्यात आलेले आहेत
काय उपाययोजना केल्या आहेत?
- नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन
- शाळा स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहे
- 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे
- दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून दिली आहे
- तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा देण्यात आली आहे
संबंधित बातम्या :