MPSC हॉल तिकीट लीक प्रकरण, बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार तपास
एमपीएससीच्या परीक्षेचे एकाच वेळी जवळपास लाखभर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.

MPSC Hall Ticket : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क परीक्षेचे हॉल तिकीट लीक झाल्याप्रकरणी आता सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 43 अ, 43 बी, 65 आणि 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता नवी मुंबई पोलिस आणि सायबर सेल करणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सकाळी टेलिग्रामवर वायरल झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटच्या लिंक नंतर तातडीने गंभीर दखल घेत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ही लिंक वायरल करण्यात आली त्या टेलिग्राम ग्रुपच्या एडमिनवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.
नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी, अमित ठाकरेंची मागणी
एमपीएससी हॉल टिकीट लीक झालेलं हे प्रकरण गंभीर असून याचा सखोल तपास करण्यात यावा, तसेच या परीक्षेसाठी नवीन प्रश्नपत्रिका काढून नव्याने ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतरसुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.
समाजमाध्यमात MPSC चे हॉलतिकिट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी ABP Majha ने यासंदर्भात काही सवाल उपस्थित केले आहेत. MPSCचे हॉल तिकिट एवढ्या सहज व्हायरल कसे होतात? हॉल तिकिट व्हायरल झाल्यानंतरही दोन तास लिंक सुरू कशी राहते? केवळ हॉल तिकीट व्हायरल झाले, डेटा लीक झाला नाही हे MPSCला तात्काळ कसं कळलं? एमपीएससीच्या कामात पारदर्शकता का नाही? परीक्षेसंदर्भात मुलांच्या मनात कुठलेही संभ्रम राहू नये म्हणून एमपीएससी काय करणार? असे सवाल या प्रकरणी उपस्थित केले आहेत.
उमेदवारांचा अन्य डेटा लीक झालेला नाही, परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच : एमपीएससी
दरम्यान या प्रकरणी एमपीएससीने स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसंच या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसंच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही.
























