महाराष्ट्र सरकारचा गुगलसोबत सामंजस्य करार, पुणे जगाच्या नकाशावर येणार
एआय संबंधित करारामुळे पुणे जगाच्या नकाशावर येईल. कृत्रिम बुद्धीमत्ता उपयोजनांच्या सहाय्याने कृषी आणि आरोग्य क्षेत्रात शाश्वत बदल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वतत विकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) ॲप्स तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार (Maharashtra government ) आणि गुगल (Google) यांच्यात ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामंजस्य करार करण्यात आला. एआय तंत्रज्ञाच्या सहाय्याने कृषी आणि आरोग्य क्षेत्रात शाश्वत बदल होण्यासह सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. गुगल इंडियाच्या मुंढवा येथील कार्यालयात करण्यात आलेल्या या कराराप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता, नागपूर येथील ट्रीपलआयटीचे संचालक प्रा. डॉ. ओमप्रकाश काकडे, ॲक्सिस माय इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता याप्रसंगी उपस्थित होते.
आज संपूर्ण जग तंत्रज्ञानाने चालत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासन चालविणे हा अतिशय सकारात्मक बदल आहे. महाराष्ट्र शासन कायमच अशा अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देत आहे. गेल्या 6 महिन्यात एआय तंत्रज्ञान वेगाने बदलले आहे. या तंत्रज्ञानात याच वेगाने बदल अपेक्षित असल्याने त्याच्या उपयोगासाठी वेगाने पावले उचलणे गरजेचे असून त्यादृष्टीने कमी वेळात झालेला हा करार सकारात्मक दिशेने उचलेले पाऊल आहे. नव्या तंत्रज्ञानात लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता असून अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Historic Day for Maharashtra - AI for Sustainability and Predictability
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 8, 2024
At the significant event of MOU signing between the government of Maharashtra and @GoogleIndia , spoke among the Googlers about the partnership focusing on leveraging AI for sustainability and… pic.twitter.com/2bdTeBwQkz
करारामुळे पुणे जागतिक नकाशावर येईल
गुगल ही जगातील मोठी तंत्रज्ञान कंपनी असून गुगलने तयार केलेली विविध नवी ॲप्लिकेशन्स लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतात. गुगलसोबत नागपुरात एक ए.आय.चे उत्कृष्टता केंद्र निर्माण करत आहोत. त्याहीपुढे जाऊन विविध 7 क्षेत्रात शाश्वततेसाठी व्यापक भागीदारीसाठी गुगलसोबत हा करार करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पुणे हे एआय संदर्भात जगाच्या नकाशावर येईल, असेही फडणवीस म्हणाले.
शाश्वत कृषी आणि आरोग्य सेवेसाठी एआय उपयुक्त
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपण प्रवेश केला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आजच्या काळात आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शाश्वतता हवी आहे. मुख्यत: आपल्या सर्वांचे जीवन शेतीच्या शाश्वततेशी संबंधित आहे. राज्यात हवामान बदल, ओला आणि सुका दुष्काळ असे शेतीवर परिणाम करणारे विविध प्रश्न असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण कृषी क्षेत्रात शाश्वतता आणू शकतो; अनेक गोष्टींचा अंदाज बांधू शकतो, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
आज सामान्य माणसापर्यंत उत्तम आरोग्य सेवा प्रदान करणे महत्वाचे आहे. शहरीकरणाच्या युगात उत्तम आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे अवघड ठरते. प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर दुर्गम किंवा ग्रामीण भागात जायला तयार नसतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस आरोग्य सुविधांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जात असतो. अशा वेळी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार आरोग्य सेवा अधिक चांगल्याप्रकारे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो, असेही ते म्हणाले.