Monsoon Updates: उद्या मुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
आतापर्यंत मान्सूनची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी येत्या एक-दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई: उद्यापासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
येत्या एक-दोन दिवसात पुणे आणि परिसरातील पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. एकूणच राज्यात पुढील पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र, मान्सूनने आतापर्यंत राज्यात दडी मारल्यानं एक टक्काच पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे, अपेक्षित पाऊस होत नसल्यानं राज्यावर पाणी संकटही बघायला मिळतंय.
जूनच्या मध्यापर्यंत राज्यात कोरडे वातावरण होते. मात्र, पुढील 24 तासात महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून येत्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आत्तापर्यंतची मान्सूनची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. राज्यातील 18 जिल्ह्यात जूनच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत एक लाख 47 हजार हेक्टरवर म्हणजेच एक टक्काच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत ओलावा नसल्यानं पेरण्या करायच्या तरी कशा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी पूर्ण झाली होती.
पेरणीची घाई नको
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जरी पाऊस झाला असला तरीसुद्धा शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असे आवाहन करण्यात आलं आहे.