(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon 2022: यंदा पाऊस लवकरच! पावसाची वर्दी देणारा 'नवरंग' कोकणात दाखल
Monsoon 2022 Indian Pitta Bird In Konkan : पावसाची वर्दी देणारा पक्षा अशी ओळख असलेला नवरंग पक्षी (Indian Pitta) कोकणात दाखल झाला आहे.
Monsoon 2022 Indian Pitta In Konkan : पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.
नवरंग पक्षाचा विणीचा हंगाम मे ते ऑगस्ट यादरम्यान असल्यामुळे हा पक्षी भारताच्या उत्तर भागातून विविध भागात मार्गक्रमण करतो. नवरंग पक्षी कोकणात दाखल झाला की पावसाच्या आगमनाची वेळ जवळ आल्याचं निश्चित मानलं जातं. फार कमी पक्षी हे आपला विणीचा हंगाम वादळी वातावरणात निवडतात आणि त्यातीलच नवरंग हा एक पक्षी आहे. जेव्हा ऋतूचक्रात बदल होतात, म्हणजेच ग्रीष्म ऋतू हा वर्षा ऋतूमध्ये पदार्पण करतो. अशावेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असते. अगदी या परिस्थितीतच हा पक्षी आपले घरटे बांधण्यात व्यस्त असतो. नवरंग हा पक्षी आपली घरटी घनदाट जंगलात बांधतात.
जून महिन्यामध्ये आपले घरटे बांधून पिल्लांना जन्म देण्यासाठी सज्ज होतो. या पक्षाची पिल्लं जेव्हा उडण्यासाठी सक्षम बनतात, अशावेळी पिलांसहित हा पक्षी पुन्हा उत्तर भारताकडे मार्गक्रमण करतो. त्यामुळे उर्वरित आठ महिने हा पक्षी आपल्या दृष्टीक्षेपात पडत नाही. या पक्षाची गणना दुर्मिळ पक्ष्यांमध्ये केली जाते. जंगलातील पानाखाली असलेले कीटक, गांडूळ विविध प्रकारचे किडे हे या पक्षाचे प्रमुख खाद्य असते.
पक्षाला नवरंग का म्हणतात?
हा पक्षी नऊ रंगांचा बनलेला असल्यामुळे याला नवरंग असे संबोधण्यात येते. भगवा, पिवळा, हिरवा, निळा, काळा, पांढरा, पोपटी, किरमिजी हे नऊ रंग पाहायला मिळतात. या पक्षाला Indian Pitta (इंडियन पिट्टा) असे देखील संबोधले जाते. पिता हा तेलगू शब्दापासून घेतलेला शब्द आहे. पित्ता या शब्दाचा अर्थ लहान असा होतो.
पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असू भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात. एकमेकांना आकर्षित करण्यासाठी हे नर व मादी विशिष्ट पद्धतीचे आवाज काढतात. त्यांचा हा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो.