Raj Thackeray : '...तोपर्यंत कोणतीही भूमिका घेऊ नये', पक्षाकडून मनसैनिकांना सूचना
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही प्रकराची भूमिका न घेण्याच्या सूचना मनसे पक्षाकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोलनाक्याच्या (Toll Naka) मुद्द्यावर भाष्य केलं आणि त्यानंतर मनसैनिकांनी टोलनाक्यावर एकच गोंधळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळीच्या देखील घटना घडल्या. त्याच पार्श्वभूमीवर जोपर्यंत टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येत नाही तोपपर्यंत कुठलीही भूमिका घेू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या सूचना मनसैनिकांना दिल्या असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आलीये.
मनसेच्या त्यांच्या ट्विटवरुन ही सूचना मनसैनिकांना केली आहे. यावर बोलताना मनसेने म्हटलं की, टोल आंदोलना संदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये. पक्षाचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ही सक्त सूचना मनसैनिकांना दिली आहे.
टोल आंदोलना संदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये. पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. बाळा नांदगावकर ह्यांची राजसाहेबांच्या आदेशाने सक्त सूचना. @BalaNandgaonkar pic.twitter.com/fdbJWJTmE9
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023
मनसैनिक आक्रमक
राज्यभरात मनसैनिकांनी टोल नाक्यावर आंदोलनं केली. अनेक ठिकाणी तर जाळपोळ झाल्याची देखील घटना समोर आल्याचं पाहायला मिळालं. तर अनेक टोलनाक्यची तोडफोड झाली. मुलुंड येथील टोलनाक्यावर मनसैनिकांनी जाळपोळ केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. तर यावेळी मनसैनिकांनी टोलनाक्यावर वाहनांना असच सोडून दिलं. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली.
अविनाश जाधव यांना अटक
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांनी मुलुंड टोलनाक्यावर वाहनांना विना टोल सोडलं. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. तर त्यामुळे पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. मनसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये यासाठी टोल नाक्यावर धाव घेतली. त्यानंतर त्यांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली.
पोलिसांची कारवाई
वाशी टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मनसेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तर, दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. या ठिकाणाहून 20 ते 25 मनसे कार्यकर्त्यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले. दहिसर पोलिसांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार चाकी वाहनांच्या टोल माफीबाबत केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप दाखवली. मात्र, प्रत्यक्षात दहिसर टोल नाक्यावर चार चाकी गाड्यांचा टोल घेतला जात होता.