(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Mahajan : दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदे एकमेकांचे कपडे फाडतील, मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील : प्रकाश महाजन
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाहीत तर तिथं नाटकं पाहायला मिळतील असे वक्तव्य मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केलं.
Prakash Mahajan on Dasara Melava : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाहीत तर तिथं नाटकं पाहायला मिळतील असे वक्तव्य मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केलं आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे शिंदे एकमेकांचे कपडे फाडतील. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अंगावर पडलेले डाग धुवून काढण्याचं काम या मेळाव्यातून होणार असल्याचे महाजन म्हणाले. उद्या (5 ऑक्टोबर) शिंदे गट आणि ठाकरे यांचे वेगवेगळे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे आणि शिंदेच्या मेळाव्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
पूर्वी दसरा मेळाव्यात विचार ऐकण्यासाठी लोक यायचे. मात्र, आता या दोन्ही दसरा मेळाव्यात एकमेकांचं वस्त्रहरण होणार असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. तसेच ठाकरे आणि शिंदे यांच्या मेळाव्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळं हे दसरा मेळावे यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटांकडून सध्या स्पर्धा सुरु असून, याच मेळाव्यावरून महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे महाजन म्हणाले.
गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भावनिक साद तर शिंदेकडून सत्तेचा वापर
दरम्यान दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घातली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून सत्तेचा वापर करण्यात येत असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. बाळासाहेबांवरची निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिकांना शिवतीर्थावर यावं लागेल असं आव्हान उद्धव ठाकरे करत आहेत. तर एकनाथ शिंदे सत्तेचा वापर करुन लोक जमवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.
सध्या दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांनीकडून दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मिळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडं बीकेसी मैदानावर शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: