(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटळा, निवडणुकीच्या हंगामात रोहित पवारांचा आरोप; महाराष्ट्रात खळबळ!
महाराष्ट्रातील आदिवासी आश्रम शाळेत दूध विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
पुणे : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळेत दुधाचा (Milk Scam) घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या कथित घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. यावेळी त्यांनी काही आकडेवारीदेखील सादर केली आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
मला निनावी व्यक्तीने 11 फाईल्स पाठवल्या आहेत. त्यापैकी दोन फाईल्स मी आणल्या आहेत. ज्यामधे महत्त्वाच्या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती आहे. पहिला घोटाळा आश्रम शाळेतील आहे. राज्यातील 1 लाख 87 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 250 मीली दूध देणे आवश्यक होते. त्यासाठी दोन कंपन्यांशी पहिला करार 2018-2019 साली आणि दुसरा करार 2023 - 2024 दरम्यान झालेला आहे. या करारानुसार 146 रुपये प्रतिलिटर दराने कंत्राटदारास पैसे देण्यात आले.
85 कोटी रुपये खर्च यायला हवा होता, पण...
शेतकऱ्यांकडून तीस रुपये प्रति रुपये तर टेट्रा पॅक 55 रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करायला हवे होते. यासाठी 85 कोटी रुपये खर्च यायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात 165 कोटी रुपये देण्यात आले आणि 80 कोटींची दलाली देण्यात आली. यासाठी आंबेगाव तालुक्यातील एका खासगी दूध उत्पादक संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आले, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
10 महिन्यांत 80 कोटी रुपयांची दलाली
आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत दूधाखरेदीसाठी ८० कोटी रुपयांची दलाली गेल्या दहा महिन्यांत देण्यात आली. दोन कंपन्यांना ही दलाली देण्यात आली. या कंपन्या कोणाच्या आहेत, कशाच्या आहेत त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो, असे काही लोक सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून दूध 30 रुपयांना घेऊन ते 143 रुपयांना विकले जात आहे. मग हा शेतकऱ्यांचा विकास आहे की तुमच्या (सत्ताधाऱ्यांच्या) मित्रांचा आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
"बाल नेत्याने आपण कमी वयात..."
दरम्यान, रोहित पवार यांनी हे आरोप करताना कोणत्याही एका व्यक्तीचे वा संस्थेचे नाव घेतलेले नाही. मात्र त्यांचा रोख हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील दिळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर होता, असे म्हटले जात आहे. रोहित पवार यांच्या या आरोपानंतर अजित पवार गटातील नेते अमोल मीटकरी यांनी एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या घोटाळ्याबाबत बोलत स्वतः ला मुत्सद्दी राजकारणी दाखवण्यासाठी धडपड करणाऱ्या बाल नेत्याने आपण कमी वयात ६००० कोटीचे मालक कसे झालो व कारखाना जप्ती का आली तेही एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगावे, अशी खोचक टीका केली आहे.
हेही वाचा>>