Sunil Prabhu : ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा यू-टर्न! शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत काय घडलं? वाचा
Mla Disqualification Case : शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे. आजच्या उलट तपासणी दरम्यान सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत बदल केला.
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena Mla Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रतोद आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी सुरू आहे. आजच्या उलट तपासणी दरम्यान सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत बदल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या आधी नोंदवलेल्या साक्षीत अध्यक्षांच्या परवानगीने साक्ष बदलण्यात आली.
विधिमंडळात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. यामध्ये व्हीप, व्हीपची सत्यता, प्रभू यांची प्रतोपपदाची नियुक्ती, आमदारांना पाठवलेले पत्र, पक्ष बैठकीतील ठराव आदी मुद्यांवर जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांची सरबती सुरू आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना सुनील प्रभू यांनी पत्र पाठवले होते. त्यावरून जेठमलानी यांनी प्रश्न विचारले. जेठमलानी यांनी 22 जून 2022 रोजीचे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले असा प्रश्न प्रभू यांना केला. त्यावर व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून हे पत्र दिले असल्याचे उत्तर त्यांनी दिले. आपण आता यावेळी व्हॉट्स अॅप मेसेज सादर करू शकता का? असा प्रश्न जेठमलानी यांनी केला. त्यावर प्रभू यांनी असमर्थता दर्शवत आता मी नेमकं सांगू शकत नसल्याचे सांगितले.
जेठमलानी यांनी आपण हा व्हॉट्स अॅपवरील मेसेज आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे का? असा प्रश्न केला. त्यावर प्रभू यांनी मला नेमकं आठवत नाही. मी हा मेसेज माझ्या मोबाईलवरून पाठवला की कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून म्हणून म्हटलं प्रयत्न करतो, असे उत्तर दिले.
यानंतर काही आणखी काही प्रश्नोत्तरे झाली. यावर सुनील प्रभू यांनी उत्तरे दिल्यानंतर दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. लंच ब्रेकनंतर सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत बदल करण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांना केली.
सुनील प्रभू यांचा यू टर्न
लंच ब्रेकनंतर सुनील प्रभू यांनी साक्ष बदलली. एकनाथ शिंदे यांना व्हॉट्सअॅप नव्हे तर मेलवर पत्र पाठवल्याचं प्रभू यांनी सांगितलं. लंच ब्रेकमध्ये मी तपासले तेव्हा ते पत्र मेलवर पाठवल्याचे आढळले. त्यामुळे साक्ष बदला अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष यांनी त्यासाठी परवानगी दिली. महेश जेठमलानी यांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवल्याचे पुरावे मागितले होते.
साक्ष बदलल्यानंतर सुनील प्रभू यांना अॅड. जेठमलानी यांनी प्रश्न विचारणा केली. जेठमलानी यांनी तुम्ही स्वतः हा ई-मेल पाठवला? असा प्रश्न विचारला. त्यावर हा ई-मेल पक्ष कार्यालयातील जोशी यांनी हा ई-मेल पाठवला असल्याचे सांगितले. मी माझ्या कार्यालयाकडून ही माहिती घेतली. यावेळी माझ्यासोबत माझे सहकारी आणि सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले त्यांच्याकडून ही माहिती घेतली असल्याचे प्रभू यांनी सांगितले. अॅड. जेठमलानी यांनी पक्ष कार्यालयातील कर्मचारी जोशी यांना तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला? असे सांगितले. त्यावर प्रभू यांनी मी त्यांना अस विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली असं म्हणालो. पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा त्यावेळी त्यांना तो मेल आढळला व त्यांनी मला सांगितलं असल्याचे प्रभू यांनी म्हटले. पटलावर सत्य माहिती समोर यावी यासाठी साक्ष बदल करण्याची विनंती केली असल्याचेही प्रभू यांनी सुनावणी दरम्यान सांगितले.