महावितरणच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका, आमदार देवेंद्र भुयारांची अधीक्षक अभियंत्याना जिवंत जाळण्याची धमकी
चार दिवसात मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो नादुरुस्त रोहित्र, सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय जाळण्याचा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला.
अमरावती : महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या घेऊन आमदर देवेंद्र भुयार यांनी अमरावती महावितरण अधीक्षक अभियंत्याची भेट घेतली. यावेळी आमदार भुयार यांनी अधीक्षकांना थेट जीवंत जाळण्याची धमकी दिली.
वरुड मोर्शी तालुक्यातील नादुरुस्त रोहित्र, सिंग फेज लाईन चार दिवसात सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यासह महावितरण कार्यालय जाळण्याचा इशारा देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. मोर्शी वरुड तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तात्काळ सोडवण्याकरिता महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाणंदे यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून चार दिवसात मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो नादुरुस्त रोहित्र, सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय जाळण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता अधीक्षक अभियंता काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरुड मोर्शी तालुक्यामध्ये 16 केव्हीचे 25 ट्रान्सफार्मर, 63 केव्हीचे 20 ट्रान्सफार्मर, 100 केव्हीचे 40 ट्रान्सफार्मर, असे एकून 85 नादुरुस्त ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधीक्षक अभियंता अमरावती यांना चांगलेच धारेवर धरले. या आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथे आढावा बैठक घेऊन मोर्शी वरुड तालुक्यातील नादुरुस्त असलेले 85 ट्रान्सफार्मर, मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच फिडरवरील रात्रीला सिंगल फेज लाईन 25 आक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळ काढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहून आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरून झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करून त्यांच्यावर कार्यवाही करणार असल्याचा इशारा दिला.