Devendra Bhuyar : सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर : देवेंद्र भुयार
एकनाथ शिंदे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं आहे. ते अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री असल्याचे भुयार म्हणाले.
Devendra Bhuyar on Eknath Shinde : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही काही चुकीचं करतील अस वाटत नसल्याचं भुयार यांनी सांगितलं. सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे असे म्हणत भुयार यांनी सरकारला धोका असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सर्वात आनंदाचा क्षण असेल
भाजपचे सर्वच नेते एकमेकांच्या संपर्कात राहतात. याचा अर्थ असा नाही की, शिंदे काही चुकीचा निर्णय घेतील. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत उघडपणे आमचे नाव घेतले. आता त्यांच्याच पक्षातील तीन आमदारांनी मतं दिली नाहीत, आता राऊत काय निर्णय घेतात ते पाहू असे देखील भुयार यावेळी म्हणाले. माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहेत. ते मुख्यमंत्री झाले तर तो सर्वात आनंदाचा क्षण असेल असेही भुयार म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं 'स्पेशल 25'; नॉट रिचेबल एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतमध्ये नेमके पोहोचले कसे?
- शिवसेनेत वादळ! एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; 'हे' आमदार एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता