Eknath Shinde : गळती थांबेना! शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात दाखल
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : आमदारांच्यानंतर आता नगरसेवकांचेही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात इनकमिंग जोरात सुरू आहे.
Eknath Shinde : आमदारांच्यानंतर आता नगरसेवकांचेही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. आज मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता स्थानिक पातळीवरही धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी हॉटेल लीलामध्ये भाईंदरमधील 18 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन जाहीर केले.
राज्यात ज्या घडामोडी पाहतोय त्यात बाळासाहेबांच्या, आनंद दिघे यांच्या भूमिकेला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना, सामान्य माणूस त्याला सुद्धा आम्ही घेतलली भूमिका, स्थापन झालेला सरकार यांनी आम्हाला मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवकांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जाहीर समर्थन आणि पाठिंबा दिला आहे. हिंदुत्वाचे, आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्यांच्या सरकारला या 18 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. आम्हाला राज्यभरातून पाठिंबा आणि समर्थन मिळत आहे. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे महापालिकेतील जवळपास 65 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर नगरसेवकांचे इनकमिंग जोरात सुरू झाले. त्यानंतर नवी मुंबई, अंबरनाथ आणि कल्याण डोंबवलीमधील नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाकडे कल दर्शवला. आता नाशिक, दिंडोरी आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जातोय.
मीरा भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान 18 शिवसेना नगरसेवक , तसेच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची जी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला.