Rajya Sabha Election : आमच्या सोबत कोण हे दहा तारखेला स्पष्ट होईल, सतेज पाटलांचं सुचक वक्तव्य
आमच्या सोबत कोण आहे दहा तारखेला स्पष्ट होईल. अपक्ष आमदारही आमच्यासोबत असतील असे वक्तव्य गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं.
Satej Patil on Rajya Sabha Election : आमच्या सोबत कोण आहे दहा तारखेला स्पष्ट होईल. अपक्ष आमदारही आमच्यासोबत असतील असे वक्तव्य गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. दरम्यान, सात जूनला महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार असल्याचे सतेज पाटील म्हणाले. अपक्षांना महाविकास आघाडीचा विचार मान्य असल्याने ते सोबत असल्याचे पाटील म्हणाले.
येत्या 10 जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसनेचे संजय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपकडून धनंजय महाडिक हे निवडणूक लढवत आहेत. हे दोन्हीही उमेदवार कोल्हापूरचे असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. याबाबत सतेज पाटील यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, त्यांनी महाविकास आघाडीचे पवार हे विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
विरोधकांनी त्यांचे आमदार सांभाळावेत
अपक्षांना महाविकास आघाडीचा विचार मान्य असल्याने ते आमच्यासोबत आहेत. विरोधी पक्ष आम्हाला आमदार सांभाळा म्हणत असेल तर त्यांनी त्यांचे आमदार सांभाळावेत असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला. आमच्या सोबत कोण आहे दहा तारखेला स्पष्ट होईल. भाजप आणि काही अपक्ष संपर्कात असल्याचा प्रश्नावर सतेज पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 18 वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना 55 आमदार, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार (अनिल देशमुख आणि नवाब मलिक वगळता), त्याशिवाय सपोर्ट करणारे काही आमदार. या सर्वांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.