जाणत्या राजाने बारामतीचा निम्मा भाग दुष्काळी ठेवला, सत्तेचा वापर फक्त स्वार्थासाठी केला, विखेंचा पवारांवर हल्लाबोल
जाणता राजा म्हणून तुम्ही ज्यांच्या पाठीमागे वर्षानुवर्ष फिरता त्यांनी आजवर तुमच्या दुष्काळी भागाला का पाणी दिले नाही? असा सवाल करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : जाणता राजा म्हणून तुम्ही ज्यांच्या पाठीमागे वर्षानुवर्ष फिरता त्यांनी आजवर तुमच्या दुष्काळी भागाला का पाणी दिले नाही? असा सवाल करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. अगदी बारामतीचा निम्मा तालुका दुष्काळी आहे. मात्र, त्याला पाणी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. आता आम्ही बारामतीच्या दुष्काळी भागाला पाणी देणार आहोत असे विखे पाटील म्हणाले.
जाणत्या राजांनी सत्तेचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लोकांना झुलविण्यासाठी केला
वर्षानुवर्ष तुम्ही यांच्या पाठीमागे पळता त्या जाणत्या राजांनी सत्तेचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लोकांना झुलविण्यासाठी केल्याचा घणाघात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आज माळशिरस तालुक्यातील पाणीव येथे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आज उद्धव ठाकरे मराठवाड्यात फिरतायेत आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारत आहेत. मात्र यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात यांनी माझे कुटुंब म्हणत जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तुम्हाला काही मिळाले का? असा सवाल भाषणात करत ठाकरेंवर सडकून टीका केली.
केंद्रात दहा वर्ष मंत्री असणारे हे जाणते राजे का आपला दुष्काळ दूर करू शकले नाहीत
शरद पवारांवर टीका करताना केंद्रात दहा वर्ष मंत्री असणारे हे जाणते राजे का आपला दुष्काळ दूर करू शकले नाहीत असा सवाल करीत तुम्हाला पाणी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावे लागले असे सांगितले. बारामती तालुक्यातील निम्मा भाग दुष्काळी असून त्या भागासाठी आता फडणवीस यांनी योजना हातात घेतली असून या भागाचा दुष्काळही महायुतीच्या सरकारमध्येच दूर होईल असे त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येईल असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:























