राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी रागाच्या भरात मंच सोडला, महाविकासआघाडीतील वादाचा नवा अध्याय
जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे नेते, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वादाचे हे पडसाद होते.

पिंपरी चिंचवड : महाविकासआघाडीतील धुसफूसीचा आणखी एक अध्याय पुण्याच्या जुन्नरमध्ये पहायला मिळाला. या अध्यायात तर थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला. माझी अडचण होत असेल तर मी निघून जातो असं म्हणत राज्यमंत्र्यांनी कार्यक्रम अर्ध्यावरच सोडला. जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे नेते, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वादाचे हे पडसाद होते.
निमित्त होतं पारगाव ग्रामपंचायत इमारतीच्या उदघाटनाचे. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच राष्ट्रवादीचे, उपसरपंच शिवसेनेचे तर उर्वरित सदस्य सर्व पक्षीयच आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला कोणतंही राजकीय रंग नसावा असा गावाचा अट्टाहास होता. म्हणून सर्व पक्षीय नेते उद्घाटन कार्यक्रमाला यावेत असा गावाचा अट्टाहास होता. पण केवळ शिवसेनेचे मंत्री इथं पोहचू शकले. मग सेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी ग्रामपंचायतीच्या इमारतीत शिवसेनेने कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जोडून घेतला. यामुळं ग्रामपंचायत कार्यक्रमाला पक्षीय रंग आला. ही बाब राष्ट्रवादीला अर्थात विद्यमान आमदार अतुल बेनके यांना आणि कार्यकर्त्यांना पचनी पडली नाही. अशातच आमदार बेनके या कार्यक्रमाला उशिरा येणार असल्याचं त्यांनी राज्यमंत्र्यांना कळवलं. पण कार्यक्रम सुरू करण्याचा त्यांनी मान्यता दिली.
मग राष्ट्रवादीचे गावातीलच एक ज्येष्ठ नेते मंचावर प्रस्थावना सादर करू लागले. तेंव्हा मध्येच दोन-तीन वेळा माईक बंद झाला किंबहुना तो बंद करण्यात आल्याचा अनेकांना संशय आला. म्हणून या कार्यक्रमाला राजकीय रंग देऊ नका असं ते वारंवार म्हणू लागले. हे वक्तव्य राज्यमंत्री सत्तार यांना खटकलं. मग ते संतापले आणि माझी अडचण होत असेल तर मी जातो, असं म्हणून रागाच्या भरात राज्यमंत्री सत्तार मंच सोडून गेले. महाविकासआघाडीच्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील ही धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली. या वादात राज्यमंत्र्यांनाच मंच सोडण्याची वेळ आल्याने महाघाडीत सर्व आलेबल नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली.
संबंधित बातम्या :
उच्च न्यायालयाने महसूल राज्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले, अब्दुल सत्तार यांनी बिनशर्त माफी मागितली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
