मनोज जरांगेंच्या 'बालेकिल्ल्या'त भुजबळांची तोफ धडाडणार; उद्या जालन्यात 'आरक्षण बचाव एल्गार'
OBC Reservation : आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
जालना : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ज्या जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरू केलं होतं, त्याच जालन्यात उद्या (17 नोव्हेंबर) ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे याच सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची तोफ देखील धडाडणार आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होतं. आता त्याच आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या या सभेत मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित असणार आहे. तर, 'जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा' अशी टॅगलाईन या सेभासाठी देण्यात आली आहे.
सभेचे बॅनर फाडले...
जालन्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे उद्या ओबीसी नेत्यांची भव्य सभा होणार आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, काही अज्ञात लोकांनी हे बॅनर फाडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
जालना पाठोपाठ हिंगोलीची सभा विक्रमी होणार
जालना जिल्ह्यातील अंबड पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात देखील ओबीसी समाजाची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जालना पाठोपाठ हिंगोलीमधील सभा देखील विक्रमी होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केलाय. तर, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध आहे. तसेच मारवाडी, जैन समाजात देखील कुणबी नोंदी आढळत आहेत. मग त्यांनाही ओबीसीमध्ये घेणार का? असा सवाल शेंडगे यांनी केलाय.
मनोज जरांगेंची प्रतिक्रिया...
दरम्यान, ओबीसी सभेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीने सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे कोणी सभा घेल्यास आमची कोणतेही हरकत नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीला सर्वसामान्य ओबीसींचा देखील पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे शांततेत सुरु असलेले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: