MHADA Recruitment : म्हाडाच्या भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा जाहीर
MHADA Recruitment : म्हाडाच्या सरळ सेवा भरती 2021 अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MHADA Recruitment : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. सरळ सेवा भरती 2021 अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 9 आणि 10 जून रोजी होणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उमेदवारांच्या कागपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 14 ते 17 जून या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.
कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक, सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
म्हाडाने जाहीर केलेल्या सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे. सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.