Water Crisis : मराठवाडा आहे की टँकरवाडा? हिंगोलीत अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा, तलाव कोरडा पडल्याने लाखो माशांचा मृत्यू
Marathwada Water Crisis : संपूर्ण मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक असून तापमान वाढल्यामुळे जलसाठे कोरडेठाक पडत आहेत.
हिंगोली: मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून हिंगोली जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील पवार तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, काळीपाणी तांडा सेवादास तांडा यासह अनेक गावांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय. तर जिल्ह्यामध्ये 41 हून अधिक ठिकाणी विहीर आणि बोरचं अधिग्रहण करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
हिंगोलीत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर टँकरच्या रांगेमध्ये थांबावे लागत आहे. हातात असलेली सर्व कामे सोडून नागरिक महिलांसह लहान मुले पाण्यासाठी टँकरची वाट पाहत आहेत. प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टँकरमधून सुद्धा अत्यल्प पाणी मिळत आहे. त्यामुळे दिवसभर वापरासाठी पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
तलाव कोडला, लाखो माशांचा मृत्यू
सध्या मे महिना सुरू आहे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे हिंगोली चे तापमान 40°c च्या पुढे गेले आहे त्यामुळे भीषण पाणीटंचाई जिल्ह्यात निर्माण झाली आहे. तापमान वाढल्यामुळे जलसाठे कोरडेठाक पडत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वडद येथील तलावातील पाणी आटल्यामुळे तलावातील लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे.
तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं असून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्याने तलावात असलेले हे सर्व मासे मृत अवस्थेत पाहायला मिळत आहेत. सर्व माशांचा तडफडून मृत्यू झाला असून या मेलेल्या माशांचा खच आता तलाव परिसरामध्ये पाहायला मिळतोय.
मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठा
राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाल्याचं दिसून येतंय. संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात 8 टक्क्यांहून अधिक जलसाठा नाही. जायकवाडीचा पाणीसाठा 6 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे. तर बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी याचवेळी 36 टक्के जलसाठा शिल्लक होता. मांजरा धरणात 1 टक्क्याच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे, मागील वर्षी याचवेळी 42 टक्के धरणसाठा शिल्लक होता.
नगर जिल्ह्यातील भंडरदरा, मुळा आणि निळवंडेतही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. भंडरदऱ्यात 15 टक्के, मुळा धरणात 10.5 टक्के तर निळवंडेत 14 टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलढाण्याची तहान भागवणाऱ्या खडकपूर्णा धरणानं तळ गाठलाय. फक्त पेनटाकळीत 14 टक्के तर नळगंगात 25.5 टक्के जलसाठा उरलेला आहे.
ही बातमी वाचा: