मराठवाड्यात धरणं तुडुंब भरली, नद्या धोकादायक पातळीवर, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, मुसळधार पावसाने शहरं जलमय
Marathwada Rain: पूर्णा, कयाधू आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत.

Marathwada Rain Update: गेल्या चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यागणिक वेगवेगळे परिणाम दिसून येत आहेत. पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले, धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस संपूर्ण मराठवाड्याला मुसळधार पावसाचा अलर्ट दिला असून बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट आहे.
बीडमध्ये बिंदुसरा व वाण प्रकल्प 100 टक्के भरला
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणी प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढला आहे. मे महिन्यात पावसाने दमदार एन्ट्री घेतली असली तरी जून-जुलैमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने सर्वत्र दिलासा मिळाला आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा बिंदुसरा पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.
परळी तालुक्याला पाणीपुरवठा करणारा नागापूरचा वाण प्रकल्पही 100% भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पाची क्षमता 19.71 दशलक्ष घनमीटर असून आता सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परळी शहरासह 15 गावांना पाणीपुरवठा याच प्रकल्पातून केला जातो. त्यामुळे परळी तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या आता मिटली आहे.
बोरी नदीवरील पुलावरून पाणी; नागरिकांचा जीवघेणा प्रवास
तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावात पावसामुळे बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. गावातील विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनधारकांना वाहत्या पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. मुलांना कडेवर घेऊन शाळेत पोहोचवण्याची वेळ आली आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून पुलाची उंची वाढवण्याची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गावकऱ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागते.
ईसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग; गाव वेढले
नांदेड जिल्ह्यातील ईसापूर धरणातून गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजपासून विसर्ग वाढवून 71,306 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हदगाव तालुक्यातील ईरापूर गावाला पूराने वेढा दिला आहे. जिल्हा परिषद शाळा व मंदिर परिसर पाण्याखाली गेला असून दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिक मात्र वाढत्या पाणीपातळीमुळे भीतीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्णा, कयाधू आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत. हळद, सोयाबीन आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून ठिबक सिंचनाच्या यंत्रणाही वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि गुंतवणूक वाया गेल्याने ते सरकारकडे मदतीची आर्त हाक देत आहेत.
नांदेडमध्ये ढगफुटी; सैन्यदल मदतीला
नांदेडच्या हसनाळ गावात रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मोठी हानी झाली आहे. या गावातील 5 लोक वाहून गेले असून आतापर्यंत 3 मृतदेह सापडले आहेत, तर 2 जणांचा शोध सुरू आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्यदलाची तुकडी गावाकडे रवाना झाली आहे.
येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडे; वाहतूक ठप्प
परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून 52,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला असून विदर्भाला जोडणारा पूल मागील 19 तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे.























