(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Rain | गेल्या चार दिवसात मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत 12 जणांचा मृत्यू
गेल्या 4 दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जालनातील 598 कोंबड्यांचा पावसामुळे जीव गेला आहे. तर 41 घरांची पडझड झाली असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यलयाने दिला आहे.
औरंगाबाद : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठावाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसात मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत बारा जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर 41 घरांची पडझड झाली असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाने माहिती दिली.
एकूण 12 मृत्यूंपैकी नांदेडमध्ये 3, बीडमध्ये 4, औरंगाबादमध्ये 2, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 664 लहान मोठी जनावरे दगवली आहेत. यात जालना जिल्ह्यातील 598 कोंबड्यांचा पावसामुळे जीव गेला आहे. तर 41 घरांची पडझड झाली असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यलयाने दिला आहे.
4 आणि 5 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 85 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 6 सप्टेंबर रोजी जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील 16 मंडळात अतिवृष्टी झाली होती. 7 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
गेल्या 4 दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जालन्यातील 18, बीडमधील 39, लातूरमधील 10, उस्मानाबाद जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 29, परभणी जिल्ह्यातील 22, तर हिंगोलीत 21 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं दाणादाण उडाली.
लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या
लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातून 145 किलोमीटर अंतर पार करणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सततच्या पावसामुळे पिकाची मोठी हानी झाली असून जिल्ह्यातील जवळपास 150 ते 200 एकरवरील ऊस आडवा झाला आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली शिवारातील दोन पाझर तलाव फुटल्याने त्याचे पाणी गावात शिरले आणि यात अनेक जनावरे वाहून गेली. तिरु नदीची पाणी पातळी देखील वाढली असून जळकोट तालुक्यातील काही गावाचा संपर्क तुटला आहे. रेणा मध्यम प्रकल्प तीन वर्षा नंतर 100 टक्के भरला सगळे सहा दरवाजे उघडे करावे लागले आहेत. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.