CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषय सक्तीचाच, मूल्यांकन पद्धत फक्त एका बॅचपुरती; शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण
Maharashtra Board: CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषयासाठी मूल्यांकन पद्धत लागू केल्यानंतर राज्य सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. त्यावर आता शिक्षण विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई: मराठी भाषा विषय सक्तीच्या करण्यासंदर्भात आणि मराठी भाषा विषयाच्या मूल्यांकनासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे. मराठी भाषा विषय सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीचा करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्यावर शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषय सक्तीचाच असून मूल्यांकन पद्धत फक्त एका बॅचपुरती असेल असं शिक्षण विभागानं सांगितलं आहे.
राज्य शासनाने पुढील तीन वर्षासाठी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी विषयांचे मूल्यांकन श्रेणी स्वरुपात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मराठी विषयाचे स्थान फक्त अ-ब-क-ड पुरते म्हणजे 'श्रेणी'पुरतीच राहिल्याची टीका केली जात आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
1 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार सर्व माध्यमांची शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. त्यानुसार हे धोरण पुढील वर्गांना खालील प्रमाणे लागू करण्यात येते.
इयत्ता पहिली ते पाचवी
- पहिली- 2020-21
- दुसरी- 2021-2022
- तिसरी- 2022-2023
- चौथी- 2023-2024
- पाचवी 2024-2025
इयत्ता सहावी ते दहावी
- सहावी- 2020-21
- सातवी- 2021-2022
- आठवी- 2022-2023
- नववी- 2023-2024
- दहावी 2024-2025
यासंदर्भात राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाशी संलग्नित शाळांनी शासनात अशी विनंती केली आहे की, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना मराठी अनिवार्य म्हणून घ्यावा लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत मराठी विषयांमध्ये अडचण निर्माण होत आहे आणि त्याचा परिणाम नववी आणि दहावीच्या इतर विषयाच्या अध्ययनावर होत आहे.
त्यामुळे 2022-23 च्या आठवीच्या बॅचला, 2023-24 ला नववी मध्ये 2024 25 ला दहावीला जाईल त्यांना एक वेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा मार्काची न ठेवता श्रेणीमध्ये रूपांतरित करण्यात यावी त्याचा समावेश एकत्रित मूल्यांकनामध्ये करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला. यामध्ये मराठी हा विषय वगळण्यात आलेला नाही तो सक्तीचाच आहे फक्त एका बॅच पुरते मूल्यांकन श्रेणी स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य बोर्डाच्या शाळांव्यतिरिक्त इतर बोर्डांना श्रेणी पद्धत
महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये म्हणजे सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रीज शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुढील तीन वर्षापर्यंत इयत्ता आठवी, नववी आणि दहावी विद्यार्थ्यांचे मराठी विषयांचे मूल्यांकनाकरिता अ,ब,क, ड श्रेणी स्वरूपात केले जाणार आहे. या मूल्यांकनाचा समावेश परीक्षा मंडळाच्या इतर विषयांच्या गुणांच्या मूल्यांकनामध्ये करण्यात येणार नाही.