मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, राहुल शेवाळेंनी घेतली साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट
Marathi Bhasha Gaurav Din: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रक्रिया सुरु असून लवकरच हा निर्णय घेण्यात येईल असं साहित्य अकादमीच्या सचिवांनी म्हटलंय.
नवी दिल्ली: राज्यात मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा होत असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट घेतली. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं आश्वासन यावेळी साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासन राव यांनी दिलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात साहित्य अकादमीकडून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अहवाल सोपवला गेला आहे. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय नवीन अहवाल सादर करेल. तिन्ही मंत्रालयाच्या माध्यमातून तातडीनं कार्यवाही केली जाईल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः लक्ष घालणार आहेत अशी माहिती आहे. या संबंधी नेमण्यात आलेल्या कमिटीतील दोन सदस्य निवृत्त झाले आहेत, ते सदस्य नव्याने नियुक्त केले जाणार आहेत.
राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना मिळणार
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. मराठी राजभाषा गौरव दिनी मुख्यमंत्री शिंदेंनी ग्वाही दिली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांना त्याबाबत विनंती देखील करणार आहे. सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे.
राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. भारतामध्ये मराठी भाषिकांची संख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा मराठी आहे. दरम्यान, जागतिक मराठी भाषा दिवसनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.