ठाकरे सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला; मराठा आरक्षणाबाबत रायगडवरुन संभाजीराजे काय भूमिका घेणार?
मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारला 6 जूनपर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. आज हे अल्टिमेट संपलं आहे. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek Din 2021) खासदार संभाजीराजे छत्रपती (Mp Sambhaji Raje Chhatrapati) मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्षं लागलं आहे.
मुंबई : कोरोना काळातही आंदोलन करु असा इशारा देत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत ठाकरे सरकारला 6 जूनपर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यामुळे मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवताना संभाजीराजे आज शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन कोणती नवी घोषणा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यभर दौरा केल्यानंतर आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजेंनी मुंबईत पत्रकार परिषदही घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी राज्य सरकारकडे प्रामुख्यानं पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या. गरज पडल्यास नवा पक्ष स्थापन करण्याची मनिषादेखील संभाजीराजेंनी बोलून दाखवली होती. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झालेले संभाजीराजे आज मराठा आरक्षणाबाबत कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
6 जूनपर्यंत आरक्षणासंदर्भात भूमिका घ्या, अन्यथा रायगडावरुन... खासदार संभाजीराजेंचा इशारा
6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला आहे. ते म्हणाले की, मी राज्यसभेचा पगार घेतो, ती माझी जबाबदारी आहे. आता लोकांची जबाबदारी नाही तर ती आता आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, मराठा समाजाला न्याय द्या : खा. संभाजीराजे छत्रपती
आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं. आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ आहे. मी असल्यामुळं मराठा समाज शांत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले होते की, मी सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मी महाराजांचा वंशज आहे. 1917 ला शाहू महाराज म्हणाले की, मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही तर मी शिपाई म्हणून नेतृत्व करायला आलो आहे. आता आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मी आझाद मैदानात स्टेजवर गेलो आणि भूमिका घेतली. कारण त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो सर्वोच्च होता. मी त्यावेळी भूमिका घेतली माझ्यावर टीका झाली. आम्हाला भांडण करण्यात घेणंदेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे. समाजाला वेठीस धरू नका, असं ते म्हणाले होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले होते की, खासदार आणि आमदार यांची ही जबाबदारी होती. मी नाशिकमध्ये अस्वस्थ होऊन आक्रमक झालो. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौरा केला. लोक आक्रमक आहेत. ते माझ्यामुळे शांत आहे. 30 टक्के श्रीमंत मराठे लोक आहेत ते रस्त्यावर येत नाहीत 70 टक्के गरीब लोक रस्त्यावर येत आहेत. मी तीन पर्याय सांगितले आहेत ते सर्वांनी मान्य केले आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं.
संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले तीन मुद्दे :
रिव्हीव्ह पिटीशन दाखल करायला 4 तारीख आहे पण कोविड मुळे ती पुढे गेली आहे. रिव्हीव्ह पिटीशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर फुलप्रुफ असावा हा पहिला पर्याय.
दुसरा पर्याय क्युरिटीव्ह पिटीशन हा आहे
तिसरा पर्याय 342-A नुसार राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव जाईल तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे जाईल
यंदा सुद्धा 'शिवराज्याभिषेक घराघरात' साजरा करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन
मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड हे दृष्य या वर्षीही महाराष्ट्राला आणि देशाला दिसणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने समस्त शिवभक्तांनी रायगडवर न येता आपल्या घरातच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
दरवर्षी 5 आणि 6 जूनला रायगडवर थाटामाटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकारने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा सुद्धा "शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात" साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवभक्तांना हे आवाहन केलंय.