Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही, सर्वेक्षण थांबवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना
Maratha Reservation Survey : राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आरक्षाणाच्या सर्वेक्षणासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याची सूचना राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलीये.
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सर्वेक्षणाला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर बंद केले जाणार आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मागासवर्ग आयोगाला पत्रक काढून राज्य मागासवर्ग आयोगाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या रात्री सॉफ्टवेअर बंद झाल्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी मागासवर्ग आयोगाला पाठविणे बंधनकारक असणार आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणासाठी 2 कोटी 12 लाखाहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच उद्या या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असणार आहे. या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आलाय. तसेच उद्यापासून सर्वेक्षण पूर्ण करुन शनिवार सकाळपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाला पूर्ण माहिती द्यायची आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने 23 जानेवारी पासून सर्वेक्षण मोहीम सुरु करण्यात आलीये. मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिशन सर्वेक्षण मोहिम राबिण्यात येत आहे. 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्ध सैनिक वसाहती (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) यामध्ये हे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
असे होत होते सर्वेक्षणाचे काम
गाव पातळीवर प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामास 23 जानेवारीपासून सुरुवात झाली होती
प्रत्येक प्रगणकाकडून 100 कुंटुंबाना भेट देऊन प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्वेक्षण झालेल्या घरावर मार्कर पेनव्दारे चिन्हांकन करण्यात आले.
सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत केले जाणार होते, त्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला भेट दिली जाणार होती.
प्रत्येक कुंटुंबातील एका सदस्याने घरी थांबून सर्वेक्षण करणारे प्रगणक यांना आपल्या कूंटुंबाची अचूक माहिती देण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते.