शरीर डिहायड्रेट झाल्याने जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, अंतरवाली सराटीत महिलांनी हंबरडा फोडला, अखेर सलाईन लावण्यास राजी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची चिंता वाढली. अनेक महिलांनी रडारड सुरु केली.
![शरीर डिहायड्रेट झाल्याने जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, अंतरवाली सराटीत महिलांनी हंबरडा फोडला, अखेर सलाईन लावण्यास राजी Manoj Jarange Patil ready to ready to take medical help put on saline at antarwali sarati शरीर डिहायड्रेट झाल्याने जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, अंतरवाली सराटीत महिलांनी हंबरडा फोडला, अखेर सलाईन लावण्यास राजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/91cbe3fc579eb7fe305c161452c777f81707906670218954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना: मराठा आरक्षणाचा कायदा तातडीने लागू व्हावा, या मागणीसाठी तब्बल चौथ्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आज सकाळपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची चिंता वाढली होती. याठिकाणी असणाऱ्या अनेक महिलांनी रडारड सुरु केली होती. तसेच उपोषणस्थळी आंदोलकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
कालपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांचे एक पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी आज सकाळी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी डॉक्टरांना माघारी धाडले होते. अखेर काही जवळचे सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी समजवल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास तयार झाले आहेत.
डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले असून त्यांना सलाईन लावली आहे. तसेच त्यांना व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले होते. मनोज जरांगे यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही डॉक्टरांनी तपासली आहे. पुढील काही काळ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून राहतील.
मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) बुधवारी बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आळंदी, पुरंदर, बारामती, सोलापूर, मनमाड याठिकाणी उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. शहरी भागात बंदला चांगला पाठिंबा मिळाला. तर ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आणखी वाचा
मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम, मर्यादा ओलांडली - नारायण राणे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण, 'संघर्षयोद्धा'च्या टीमने घेतला मोठा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)