Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय? ते शोधणार, जरांगे पाटलांचा निर्धार
Manoj Jarange : आजपासून मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होत असून, त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange on Maratha Reservation : सरकारला दिलेला वेळ संपल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो. पण, मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय, ते शोधणार, असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की, तो पाळतात ही त्यांची ख्याती, त्यांनी शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान, कौतुक आणि आदरही करतो. पण, आमच्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी दिली आहे. आजपासून जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होत असून, त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
न टिकणारे आरक्षण दिल्याने मागच्या वेळी न्यायालयात जावं लागलं. बाकीच्यांना आरक्षण कशातून दिलं, त्यात मराठा समाज बसतो की नाही, मराठ्यांनी सगळे निकष पार केले की नाही, मग सरकारला आरक्षण देण्यात काय अडचण आहे. सारखा तोच कायदा का सांगता, असे सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
सरकार अजून काय करतंय, जरांगेंचा सवाल
जरांगे यांनी सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केलं आहेत. बाकीच्यांना आरक्षण देणं कसं शक्य झालं, मराठ्यांना आरक्षण देणं कसं शक्य नाही. माझ्या बांधवांचा व्यवसाय काय आहे. कुणबी बांधव आणि मराठा बांधवांचा व्यवसाय काय, कोणत्या निकषामध्ये आम्ही बसत नाही, ते सांगा. तुम्ही 30 दिवसांचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला, आज 41 वा दिवस आहे. तरी, सरकार काय करतंय.
'मुख्यमंत्र्यांना कुणीतरी आड पडतंय'
मुख्यमंत्र्यांना आरक्षण कोण देऊ देत नाही, यामागचं कारण शोधायला हवं. काय अडचण आहे, ते शोधाला हवं. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना कुणीतरी आड पडतंय, हे 100 टक्के खरं दिसतंय, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.
उग्र आंदोलन करु नका, आत्महत्या करू नका
आमच्या लेकरा-बाळांचा प्रश्न आहे. राज्यात आंदोलन शांततेत सुरु आहे. सर्व समाजाला आवाहन करतो, शांततेत आंदोलन करा. कुणीही उग्र आंदोलन करु नका, आत्महत्या करू नका. आरक्षण कसं मिळत नाही, ते आपण बघू. आजपासून मराठा समाजासाठी, आपल्या समाजावर अन्यास होऊ नये, यासाठी मी आजपासून उपोषणाला बसवतोय, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण आहे, काळजी करू नका, उग्र आंदोलन करु नका, शांततेनं आंदोलन सुरु ठेवा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.