(Source: ECI/ABP News/ABP Majha)
20 तारखेला पुन्हा उपोषण, त्याच दिवशी मोठी घोषणा; मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप
मनोज जरांगे यांनी हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली होती. त्यानंतर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून दौरा करत आज छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी आपल्या रॅलीचा सांगता केली
संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 2 महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, मनोज जरांगे यांनी 1 महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत सगेसोयरे आणि मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. जरांगे यांनी दिलेल्या मुदतीची वेळ आज संपत असून संभाजीनगरमधून (Sambhajinagar) मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला याची आठवण करुन दिली आहे. तसेच, सरकारने काही तो निर्णय घ्यावा, अन्यथा 20 जुलैपासून आपण पुन्हा उपोषणलाा बसणार असल्याची घोषणाच त्यांनी केली. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा (Maratha) समाजाचे प्रतिनिधी द्यायचे की नाही, 288 जागांवर निवडणूक लढवायची की नाही, याबाबतची घोषणाही त्याच दिवशी करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली होती. त्यानंतर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून दौरा करत आज छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी आपल्या रॅलीचा सांगता केली. यावेळी, संभाजीनगरमधून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
आज या लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठ्यांसमोर सरकारला जाहीर सांगतो, आजची रात्र सरकारच्या हातात आहे. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं, त्या छगन भुजबळच्या नादी लागू नका, उद्या दुपारी वाखरी येथे रिंगण सोहळ्याला मला तुकोबारायांच्या दर्शनाला जायचं आहे. मी उद्याच उद्या निर्णय घेणार होतो, पण उद्या दर्शनाला जात आहे. 18 आणि 19 तारीख दोनच दिवस माझ्या हातात आहेत, पुन्हा 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. मी स्थगित केलेलं उपोषण 20 तारखेला पुन्हा सुरू करणार असून त्याचदिवशी उमेदवार द्यायचे का नाही हे ठरवणार, असल्याचे जरांगे यांनी म्हटलं. सरकार ला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे, 20 तारखेला तारीख जाहीर करू, त्या दिवशी 288 पाडायचे की उभे करायचे हे ठरवू आणि मुंबईला कधी जायचे हेही ठरवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले. नुसता मराठवाडा निघाला तर यांचे दंडुके काहीच काम करणार नाहीत, असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला.
दीड कोटी मराठे ओबीसीत आले आहेत
40 वर्ष लढणाऱ्याना सरकारने काहीच दिले नाही, पण 10 महिन्यात काही ना काही मिळालंय ना?. दीड कोटी मराठे ओबीसीमध्ये आले आहेत. छगन भुजबळ तू पायावर चालतो मी डोक्यावर चालतो, असे म्हणत पुन्हा एकदा छगन भुजबळांवर जरांगेंनी हल्लाबोल केला. तसेचस, विधानपरिषद निवडणुकांच्या निकालावर भाष्य करत, काल जे 20-25 आमदार निवडून आले ते मराठ्यांच्या मतावर निवडून आले आहेत, आलेले सर्वचच्या सर्व बावळे आहेत, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, विधानपरिषदेच्या आमदारांना कोणत्या मराठ्याच्या नेत्यांनी मतदान केले, माझ्याकडे यादी येणार आहे, असेही ते म्हणाले. ओबीसी आमदारांना मतदान करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा, असेही ते म्हणाले.
मंडल कमिशन बरखास्त होऊ शकतं
सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय. याला एक तर बदनाम करा नाहीतर घातपात करा. सरकार मला काय घात पात करेल. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागं असल्यावर यावं, एका बुक्कीत दात पाडेन. मंडल कमिशन बरखास्त होऊ शकत, पण मला ओबीसींच वाटोळं करायचं नाही, असेही जरांगे यांनी संभाजीनगरमधील भाषणातून म्हटले.