Manipur Violence: मणिपूरमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका विशेष विमानाची सोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे
Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur Violence) अडकलेल्या सर्व 22 मराठी विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून केली. विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याचं स्पष्ट केलंय. विशेष विमानाची व्यवस्था करत तातडीनं विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
ईशान्येकडील मणिपूर राज्य पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळताना दिसत आहे. मणिपूर सरकारने अत्यंत गंभीर परिस्थितीत हिंसाचार करणाऱ्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. 3 मे रोजी मणिपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात हिंसाचार उसळला आहे. हिंचासारात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्यापही अधिकृत आकडे जाहीर करण्यात आलेले नाही. अशा भीषण परिस्थिती काही राज्यातील विद्यार्थी जे आयआयटी आणि एनआयटीमध्ये अडकून पडलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपआपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलं होतं. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरातील परिस्थिती विद्यार्थ्यांकडून समजावून घेत मदतीचं आश्वासन दिलंय.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.
गेल्या दोन दिवसांत जमावाने मणिपूर राज्यातील गावांवर हल्ले केले, घरे जाळली, दुकानांची तोडफोड केली आहे. पालक इतके घाबरले की त्यांनी मुलांना रडू कोसळू नये म्हणून झोपेच्या गोळ्या दिल्यात. येत्या काही दिवसांत हल्ले वाढतील आणि मोठ्या प्रमाणावर रक्तपात होण्याची भीती स्थानिक रहिवाशांना आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :