Sharad Pawar: मणिपूरमध्ये फोन खणाणला! हॅलो शरद पवार बोलतोय....अन् 'ते' महत्वपूर्ण ऑपरेशन फत्ते
राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर देखील सिल्व्हर ओकवरून अनेक सर्वसामान्याची कामे आपल्या स्टाईलने फोनवरून करून दिली.
सांगली: मागील आठ दिवस हे शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) चर्चेच्या केंद्रस्थानी होते. राज्यासह देशाचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे होते. मात्र या कालावधीत शरद पवार यांनी सिल्व्हर ओकवरून अनेक सर्वसामान्याची कामे आपल्या स्टाईलने फोनवरून करून दिली. यातीलच एक काम म्हणजे मणिपूरमध्ये काही दिवसापासून सुरु असलेल्या दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केलेली मदत आणि विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी झालेली रवानगी...
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही विद्यार्थी मणिपूर येथे शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. मणिपूरमध्ये काही दिवसापासून सुरु असलेल्या दंगलीत हे विद्यार्थी सापडलेले. यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंडी गावातील संभाजी कोडग यांचा मुलगा मयूर तिथे अडकला होता. याशिवाय अनेक मुले अशाच पद्धतीने अडकली होती. कोडग यांच्या मुलाने वडिलांना फोन करून मणिपूरमधील परिस्थिती सांगत आम्हाला येथून वाचवा, आजुबाजुला गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येत आहेत. कदाचीत हा माझा शेवटचा फोन असेल, काहीतरी करा अशी विनवणी केली.
मणिपूरमधील परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संभाजी कोडग यांनी थेट बारामतीचे प्रल्हाद वरे यांना फोन लावला. मणिपुरच्या हिंसाचारात महाराष्ट्रातली आय.आय.टीचे शिक्षण घेणारी दहा मुले हॉस्टेलवर अडकली आहेत त्यांना काहीही करून वाचवा अशी विनवणी केली. वरेंनी 5 मे ला मुंबईत पवारसाहेबांना भेटायला जाऊ असे सांगितले. पण दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असल्याने संभाजीरावांनी साहेबांपर्यंत निरोप पोहचवण्याची विनंती केली. वरेंनी पवार यांचे खाजगी सचिव सतिश राऊत यांना तातडीने संपर्क केला.
सतिश राऊत यांनी फोनवरून सगळी परीस्थीती समजून घेतली. शरद पवारांपर्यंत हा निरोप पोहचवला. घटनेचे गांभीर्य जाणून शरद पवार यांनी तातडीने मणिपुरच्या राज्यपालांना फोन केला आणि महाराष्ट्रातील 10 मुलांबरोबर दुसर्या राज्यातील त्यांच्या दोन मित्रांना सुरक्षीत स्थळी हलवण्यास सांगितले. मुलांचे लोकेशन, संपर्क क्रमांक शरद पवारांच्या कार्यालयाकडून पाठवले.
रात्री बाराच्या दरम्यान मणिपूर मिल्र्टीच्या चिफ कमांडरांचा संभाजी कोडग यांचा मुलगा मयुर कोडग या विद्यार्थ्याला फोन आला आणि आमची टीम तुम्हाला सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी थोड्याच वेळात हॉस्टेलवर येत आहे असा निरोप दिला .त्या रात्रीतच या 12 मुलांना लष्करी छावणीमध्ये सुरक्षीतरीत्या स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे शरद पवार यांनी एकीकडे पक्षाच्या अध्यक्षपदापासून दूर होण्यचा जाहीर करत असताना दुसरीकडे सर्वसामान्य लोकाची कामे सुरूच ठेवली होती.
या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविली. पवार यांच्या तत्परतेमुळे मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना मिल्ट्रीने संरक्षण पुरवत सुरक्षित स्थळी हलविले. शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या वरून निर्णय जाहीर केल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. अनेक नेत्यांनी पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांना विनंती केल्या होत्या. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी आपल्या मुलांसाठी तात्काळ फोन करून मुलांचे जीव वाचवल्याबद्दल पालकांनी पवारांचे आभार मानलेत.