Majha Maharashtra Majha Vision 2024 : 'ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा'; सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आव्हान
ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच त्यांनी भाजपवरदेखील सडकून टीका केली आहे.
Majha Maharashtra Majha Vision 2024 : प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो, आता 24 तास नुसते राजकारण होते. मग देशाची सेवा कधी करणार? राज्यातील गृहविभाग कमकुवत झाले आहे. अडचण आली की भाजप पवारांवर खापर फोडतं, ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच. आता माझी वेळ आहे. याआधीही संकट आलेत. अडचणी सगळ्यांना येतात. आपण मक्तेदारीतून बाहेर पडावे. राजकारण म्हणजे पक्ष फोडणे, घर फोडणे नव्हे. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झालेत. त्यात ८० टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करायचे असते, असे माझ्यावर संस्कार झालेत. आता 24 तास नुसते राजकारण सुरु आहे. मग देशाची सेवा कधी करणार? आता नैतिकता राहिली नाहीये. आता नैतिकता सोडून सगळे चालले आहे, असे त्या म्हणाल्या.
अजित पवारांना पक्षात हवी होती ती पद दिली
माझ्याकडून कुटुंब आजही तुटलेले नाही. अजित पवारांना पक्षात हवी होती ती पद दिली. अजित पवार आमच्याकडे असताना ते एकच उपमुख्यमंत्री होते. आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. कामाचे वेगवेगळे विभाजन झालेले दिसत आहे. त्यांची काही वैयक्तिक कारणे असतील. मला असे वाटच नाही की अजित पवारांमध्ये अस्वस्थता होती. त्यांना जे जे पद हवे होते ते त्यांना एकमताने देण्यात आलेत. अध्यक्षपदाची मिटिंग होती मात्र दोन तारखेला दादाने हा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे.
काही गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवायच्या असतात
शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी अजित पवारांवर कार्यकर्ते सांभाळायची जबाबदारी देण्यात आली होती. अजित दादांना जाणीवपूर्वक व्हिलन ठरवले गेले, असे अजित दादांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा अनेक चर्चा होतात. ज्यांनी कोणी तुम्हाला असे सांगितले असेल त्यांनी त्या ऑन रेकॉर्ड सांगाव्यात. मला सगळे सांगायचे नाही. काही गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवायच्या असतात. त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते.
अजित पवारांनी वेगळी विचारधारा मान्य केलीय
शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेत सामील होण्यास सांगितले, अशी चर्चा होत असते. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आता काहीच राहिलेले नाही. अजित पवारांनी आता एक वेगळी विचारधारा मान्य केली आहे. ती विचारधारा आमची नाही. त्यामुळे आता असा प्रश्नच येत नाही. त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावे. आम्ही आमच्या विचारधारेत काम करू, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप अडचणीत आली की खापर पवार साहेबांवर फोडतात
आशिष शेलार यांनी जातीय द्वेष पसरवून त्याच्या जोरावर राजकारण करण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केले जातात, असा आरोप केला. तसेच, मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही व्यक्तींकडून टीका होत आहे. या व्यक्ती शरद पवार गटाशी संबंधित आहेत. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या या सगळ्याशी काय संबंध आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. शरद पवारांनी या गोष्टीचे स्वागत केले आहे. दुसरे म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही सूट होत नाही, किंवा ते जेव्हा अडचणीत येतात. तेव्हा भाजपा सगळे खापर पवार साहेबांवर फोडतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
अबकी बार गोळीबार सरकार
अबकी बार गोळीबार सरकार झालेले आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहेत. विधानभवनात मारामाऱ्या होतात. माझ्या पीएला मी सांगते विधानभवनात संध्याकाळीच जा कारण माझा पीए तिथे जायचा आणि त्याच वेळी एखादा मंत्री गोळीबार करायचा. त्यामुळे त्याची अडचण व्हायची, असा टोला त्यांनी यावेळी सरकारला लगावला आहे.
माझा लोकशाहीवर विश्वास
सुनेत्रा पवार बारामतीतील लोकसभा निवडणूक लढवतील का? अशी विचारणा केली असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तो त्यंच्या गटबंधनचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत मी कसे सांगणार? मी लोकशाहीवर प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्याविरोधात लोकशाहीमध्ये कोणीतरी लढलेच पाहिजे. माझी वैचारिक लढाई आहे. माझी वैयक्तिक लढाई आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा
राज्यातील गृहविभाग कमकुवत झाला आहे. आम्ही सत्तेत आलो की भ्रष्ट्राचाराचे, घराणेशाहीचे आरोप केले जातात. बदल्याचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखाद्याने वेगळा निर्णय घेतला म्हणून ती व्यक्ती शत्रू होत नाही. आमच्या बरोबर गेले ते चांगले आणि त्यांच्याबरोबर गेले ते वाईट असं नाही. भाजपने केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं. कृपाशंकर सिंह, अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला की नाही, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मविआचा परफॉर्मन्स चांगला असेल
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना म्हटलं आहे की, आमचं जागावाटपाचे ठरलं नाही म्हणता, मग त्यांचं तरी कुठे ठरलं. लोकसभेत मविआचा परफॉर्मन्स चांगला असेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी व्यक्त केला आहे.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :