'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'': आज दिवसभर एबीपी माझावर नेत्यांसह दिग्गजांचं व्हिजन
एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे.
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत. 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
15 ऑगस्टला आपण देशाचा पंच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करतोय.आपल्या देशाचा देशाचा नकाशा नजेसमोर आणला लक्षात येतं की भौगोलिकदृष्टया आपल्या महाराष्ट्राचं स्थान बरोबर मध्यभागी आहे. आणि तसंच ते देशाच्या प्रगतीत सुद्धा. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले..खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा ही सेनापती बापटांची वाक्य देशातलं महाराष्ट्राचं कर्तृत्व अधोरेखित करतात.
Nation First-Always First, राष्ट्र सर्वप्रथम, सदैव सर्वप्रथम ही यावेळच्या स्वातंत्र्यदिनाची थीम आहे. अर्थात महाराष्ट्राला हे काही वेगळं सांगण्याची गरजच पडली नाही. कारण देशाच्या इतिहासातलं कोणतंही महत्वाचं पानं असो की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या घटना महाराष्ट्रानं सदैव देशासाठी सर्वस्व दिलंय. देशातलं सामाजिक, सांस्कृतिक-राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहतंय याचा अंदाज घ्यायला महाराष्ट्राकडे आधीही बघितलं जायचं आणि आजही क्रांतीचा, विकासाचा, नवनिर्मितीचा वारसा घेऊन आपण पुढे जातोय.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपला देश, आपलं राज्य आणि नागरिक म्हणून आपण किती पुढे गेलोय, भविष्यात आपल्याला काय करायचंय, आणि स्वातंत्र्याची शंभरी साजरी करताना आपण कुठे असायला हवंय याची चर्चा करण्याचा आजचा टप्पा आहे.