(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संक्रातीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ, लोकसभेला 45, विधानसभेला 225 प्लस टार्गेट, कोण किती जागा लढणार?
लोकसभेच्या 45 हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात 45+ लोकसभा मतदारसंघांवर (Lok Sabha Election) भगवा फडकवण्याची घोषणा केल्यानंतर भाजप (BJP) आणि महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्ष कामाला लागले आहेत. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहे. 45 हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला आहे. आज मुंबईत तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, जिल्हा, तालुका आणि बूथ पातळीवर मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचे जाहीर मेळावे होणार आहय घटक पक्षाचे नेते देखील या मेळाव्याला हजर असतील. मोदींजींच्या नेतृत्वात राज्यात महायुतीला एक मोठे यश मिळेल. 45 प्लस जागा या राज्यात जिकणार आहोत. 51 टक्के मते मिळणार आहेतय आमच्या तीनही पक्षांनी महायुती मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष प्रवेशाचे रोजच निमंत्रण येत आहे.महायुतीमध्ये अनेक जण यायला इच्छुक आहेत. राज्यातले 45 च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील.47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधताना मोदी हेच पंतप्रधान हवेत असं म्हटलंय. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी विचारणा : बावनकुळे
पक्षप्रवेशावर बोलतान बावनकुळे म्हणाले, पक्षप्रवेशासाठी लोकांचा ओढा लागला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीकडे केवळ नेते शिल्लक असतील, कार्यकर्ता कुणीच नसेल. जेव्हा मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे 45 खासदार उभे असतील. विधान सभेत देखील 225 प्लस महायुती क्रॉस करेल.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला यश मिळेल.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अजित पवार गटाचे जाहीर मेळावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, गेले 10 वर्ष देशाचे नेतृत्व यशस्वीपणे नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राज्यात आज महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीचे मेळावे होणार आहेत. 1 हजार प्रमुख कार्यकर्ते यासाठी असणार आहेत. राज्यव्यापी मेळावा आम्ही वरळीत घेतला होता. आमच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले होते. 14 तारीखपासून आम्ही मेळावे आयोजित केले. सहा प्रादेशिक विभागात आम्ही मेळावे आयोजित केले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही जाहीर मेळावे आम्ही करणार आहोत.
शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे म्हणाले, अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झालेले आहेत. विभाग पातळीवर, गाव पातळीवर महायुतीचे सर्व मेळावे आपण आयोजित करत आहोत.