Maha Morcha of MVA : 'महाराष्ट्रद्रोह्यांना गाडण्यासाठी एकत्र', महाविकास आघाडीच्या महामोर्चातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीकडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.
MVA Mahamorcha Top 10 Points : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा (Mahamorcha) काढण्यात आला. राज्यभरातील (Maharashtra) महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोर्चात दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल राज्यपालांनी (Governor) केलेलं वादग्रस्त वक्तव्य तसेच फुले, आंबेडकरांबाबतचं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य यामुळे वाद निर्माण झाला. याशिवाय भाजप नेत्यांकडून महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असं म्हणत महामोर्चा काढण्यात आला.
1. उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरेही मोर्चात सहभागी
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचीही मोर्चामध्ये उपस्थिती पाहायला मिळाली. त्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) या मोर्चात सहभागी झाले होते.
2. क्रूडास कंपनी ते टाईम्स इमारतीपर्यंत मोर्चा
भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते सीएसएमटी पर्यंत या मोर्चाचे आयोजन काढण्यात आला. हे सुमारे तीन किलोमीटरचं अंतर आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सुरु झालेला या मोर्चाची सीएसएमटी स्थानकाजवळ नेत्यांच्या भाषणानंतर सांगता झाली. महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं.
3. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत, पोलिसांचा चोख बंदोबस्त
महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राज्यभरातील शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. जागोजागी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली होती. ड्रोनद्वारे पोलिसांनी मोर्चावर नजर होती. मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता.
4. मोर्चाला अनेक संघटनांचा पाठिंबा
डाव्या संघटनांनी देखील महाविकास आघाडीच्या महामोर्चाला पाठिंबा दिला. मुंबईमध्ये ठाणेसह सोलापुरातून देखील डाव्या संघटनांचे कार्यकर्ते दाखल झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोर्चात सामील झाले. आपापल्या पक्षाचे झेंडे आणि निषेध फलक घेऊन कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
5. महाविकास आघाडीच्या मोर्चात महापुरुषांचे पुतळे
महाविकास आघाडीच्या मोर्चात महापुरुषांचे पुतळे पाहायला मिळाले. महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी मविआने हा मोर्चा काढला होता. त्यामुळे या मोर्चामध्ये महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळे मोर्चात पाहायला मिळाले. राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
6. महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार : उद्धव ठाकरे
महाराष्ट्र द्रोह्यांचा शेवट करणारा हा मोर्चा आहे.महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. छत्रपतींचं नाव घेण्याचा लफंग्यांना अधिकार नाही, कोश्यारींना राज्यपाल मानत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
7. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही : शरद पवार
आपण आज जमले आहोत कारण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र आलो आहोत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार पुढे म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे ते महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.
8. ही आंदोलनाची ठिणगी, यातून वणवा पेटेल : संजय राऊत
ही आंदोलनाची ठिणगी असून यातून वणवा पेटेल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. हे सरकार निर्लज्ज आहे, असं म्हणत राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
9. ही अस्मिता आणि स्वाभिमानाची लढाई : सुप्रिया सुळे
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, ही अस्मिता आणि स्वाभिमानाची लढाई आहे. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीची ही लढाई आहे. कुणीही टपली मारुन गेले तर सहन करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
10. भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न : नाना पटोले
नाना पटोले यांनी महामोर्चाच्या सभास्थळी संबोधन केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, सीमावादाचा विषय सुरु झाला आणि त्यामध्ये राज्यांतील अनेक गावे परराज्यात जाणण्यासाठी मागणी करतं असल्याची परिस्थीत निर्माण झाली आहे. भाजप महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.