Mahashivratri 2021 Vrata: आज महाशिवरात्री, असे करावे भगवान शिवशंकराचे व्रत
Mahashivratri 2021 Vrata Vidhi: आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
Maha Shivaratri 2021 : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या वाईट प्रवृत्तींपासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
व्रत पद्धत व विधी
महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
पूजेचा विधि आणि योग्य वेळ
यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी पूजेची सर्वात शुभ वेळ रात्री 12:06 ते दुसऱ्या दिवशी 12 मार्चला रात्री 12:55 पर्यंत आहे. महाशिवरात्री प्रथम प्रहर पूजा 06:27 PM ते 09:29 PM, द्वितीय प्रहर पूजा 09:29 PM ते 12:31 AM (मार्च 12), तृतीय प्रहर पूजा 12 मार्च 12:31 AM ते 03:32 AM,चतुर्थ प्रहर पूजा 03:32 AM ते 06:34 AM पर्यंत. चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 11 मार्च रोजी 02:39 PM पासून 12 मार्च 03:02 PM वाजेपर्यंत असणार आहे. 12 मार्च को शिवरात्री व्रत पारण वेळ 06:34 AM ते 03:02 PM पर्यंत असणार आहे.