बळीराजाची स्वप्न 'पाण्यात', किसानपुत्रांचा एल्गार, सोशल मीडियावर #ओला_दुष्काळ ट्रेंड
महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. यात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरावं आणि तात्काळ मदत घोषित करावी यासाठी शेतकरीपुत्रांनी सोशल मीडियावर काल ओला दुष्काळ हा ट्रेंड चालवला.
मुंबई : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून सावरावं आणि तात्काळ मदत घोषित करावी यासाठी शेतकरीपुत्रांनी सोशल मीडियावर काल ओला दुष्काळ हा ट्रेंड चालवला. काल सायंकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान हा ट्रेंड टॉपवर होता.
राज्य सरकारकडून पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिलेला नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, अशी शेतकरी पुत्रांची भावना आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.
औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. तर सोलापूर, उस्मानाबादमध्ये तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याचं दिसलं. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.
सातत्याने होणारे नुकसान, त्यात कोणत्याही प्रसंगात मदत न मिळणे, यामुळे अतिशय गंभीर प्रश्न शेतकर्यांपुढे उपस्थित झाले आहेत. सातत्याने विनंती करूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर 25 आणि 50 हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरून तर शेतकर्यांना आणखी वेदना होत आहेत. मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तिथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे, असं किसानपुत्रांचे म्हणणे आहे.
अतिवृष्टीमुळं शेती आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान त्याचा अंत आता बघू नका, लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा, असं स्वरुप रहाणे यांनी म्हटलं आहे.
अतिवृष्टी मुळं शेती आणि शेतकऱ्यांच अतोनात नुकसान त्याचा अंत आता बघू नका लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks#ओला_दुष्काळ pic.twitter.com/ynZKNBEBCk
— Swarup Rahane (@swaruprahane88) October 16, 2020
अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, डोळ्यादेखत अस्मानीनं होत्याचं नव्हतं झालंय. आयुष्याचं स्वप्न, पोरांच शिक्षण,पोरीचं लग्न, म्हाताऱ्यांचा औषधोपचार, इतकंच नव्हे कुटुंब जगवायचं कसं अशा अनेक प्रश्नांत शेतकरी जगण्याची उमेद हरवू शकतोय. सरकारने त्वरीत #ओला_दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करावी.
डोळ्यादेखत अस्मानीनं होत्याचं नव्हतं झालंय. आयुष्याचं स्वप्न, पोरांच शिक्षण,पोरीचं लग्न, म्हाता-यांचा औषधोपचार, इतकंच नव्हे कुटुंब जगवायचं कसं अशा अनेक प्रश्नांत शेतकरी जगण्याची उमेद हरवू शकतोय. सरकारने त्वरीत #ओला_दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करावी.@CMOMaharashtra@PawarSpeaks
— Anil Shinde (@AnilShinde5678) October 16, 2020
वैभव वाघ म्हणतात, जगाचा पोशिंदा जे नेहमीच असणाऱ्या अनिश्चित नैसर्गिक धोक्याला स्वीकारुन कर्तव्य पार पाडत असतात..सध्या ते संकटात आहेत..त्यांना दिलासा हवाय संकटाशी लढायला पाठबळ हवंय. शेतकऱ्यांचे अश्रू लाव्हारसात बदल्याआधी सरकारनं निर्णय घ्यावा.
जगाचा पोशिंदा जे नेहमीच असणाऱ्या अनिश्चित नैसर्गिक धोक्याला स्विकारुन कर्तव्य पार पाडत असतात..सध्या ते संकटात आहेत..त्यांना दिलासा हवाय संकटाशी लढायला पाठबळ हवय. शेतकऱ्यांचे अश्रु लाव्हरसात बदल होण्याअगोदर निर्णय घ्यावा लागेल...#ओला_दुष्काळ @OfficeofUT @PawarSpeaks
— Vaibhav Wagh (@vaibhav__08) October 16, 2020