Maharashtra Lockdown Speculations: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित, कडक निर्बंध लागणार?
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी सरकारकडून कडक निर्बंध लावण्याचे संकेत मिळत आहे.
मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांचे नोंद झाली. आज राज्यात 25,681 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज 70 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.20% एवढा आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतचे उच्चांकी आकडे येत असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती असावी असे आदेश शासनाने काढले आहेत.
आज 14,400 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 21,89,965 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.42% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,80,83,977 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 24,22,021 (13.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,77,560 अॅक्टीव रुग्ण आहेत.
मुंबईत पुन्हा कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पहायला मिळाला आहे. आज मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या 3000 पार गेली आहे. आज 3062 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात आज तब्बल 5065 कोरोना रुग्णांची नोंद तर 24 रुग्णांचा मृत्यू. 9510 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे.
सरकारचे नवे आदेश
कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. याच धर्तीवर नुकतेच राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ( आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाल्यामुळे कार्यालयांमध्ये काही अंशी सुरु झालेली कर्मचाऱ्यांची ये-जा येत्या काळात पुन्हा एकदा कमी किंवा ठप्प होण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.