Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं सावट! वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार; हवामान विभागाकडून अपडेट
IMD Weather Update : राज्यासह देशात गारठा वाढला आहे. वर्षाअखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Update Today : राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण (Temperature Drops) झाली आहे. राज्यासह देशात गारठा वाढला आहे. वर्षाअखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे. परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यावर पावसाचं सावट
राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पारा कमालीचा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे. राज्यातील वर्षाअखेरपर्यंत असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे.
दक्षिण भारतात पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज तामिळनाडू, पुद्दुचेरी या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. आता तामिळनाडूमधील जनजीन पूर्वपदावर येत असताना आयएमडीने आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा घसरला
उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली गपोहोचलं आहे. नागरिक गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घटट झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगला घसरला आहे.
नाताळनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम होताना दिसत आहे. आता काही दिवस तापमानात घट होताना दिसेल. 25 डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वर्षाअखेरसह नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.