राज्यात पावसाचा धुमाकूळ, उभी पीकं पाण्यात; 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पाऊस, हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Weather: गेल्या 15 दिवसांपासून राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचा जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात 28 सप्टेंबरपर्यंत जाणवू शकतो. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.मराठवाड्यात आठवडाभरापासून सर्व दूर जोरदार पाऊस झाला आहे. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड धाराशिवसह बहुतांश ठिकाणी धरणांचे विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे.
काय अंदाज आहे IMD चा ?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः हा पाऊस दुपारनंतर अधिक प्रमाणात पडेल असा अंदाज वर्तवला जातोय. या कालावधीत काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र 26 सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्यभर दिसून येईल.
विदर्भ मराठवाड्यात पुन्हा पावसाची शक्यता
26 सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर 27 सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. यावेळी काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
२८ सप्टेंबरला राज्याच्या पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकरी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यासोबतच कृषी विभागानेही शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
ऑगस्ट सप्टेंबर अतिवृष्टीतच !
यंदा मान्सूनच्या सुरुवातीला राज्यात काही काळ पावसाचा जोर होता, मात्र नंतर दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्यामुळे काही भागांमध्ये जलसाठा वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातून मान्सूनचा निरोप किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पावसाचा अनियमित पण जोरदार प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार आहे.
राज्यातील शेतकरी, विशेषतः द्राक्ष, सोयाबीन, कापूस, उडीद व तूर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार आपली शेती व्यवस्थापनाची तयारी करावी, असा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जात आहे.
























