(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे, मुंबईत पावसाचा यलो अलर्ट! विदर्भ, मराठवाड्यात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई : राज्यात पुढील 48 तासांत विविध भागात मुसळधार पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज कोकणात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा आयएमडीने जारी केला आहे.
राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारा वाहण्याचा अंदाज देखील आयएमडीने वर्तवला आहे.
कोकण आणि मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटींग
कोकण आणि मराठवाड्यात गेल्या 24 तासांत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांतही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिंधुदु्र्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरात मेघगर्नजसह रिमझिम पाऊस
मुंबईत गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्नजसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना 24 तासांसाठी यलो अलर्ट आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना आज आणि उद्यादेखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 14, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/hhkvwqKXPx
उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 3-4 दिवसांत भारताच्या उत्तरेकडील भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची आणि त्यानंतर उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.