देशभरात गारठ्याला सुरुवात, उत्तरेतून थंड वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय, महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, कुठे किती होता पारा?
Weather : महाराष्ट्रात सर्वाधिक किमान तापमानाची घट जळगाव जिल्ह्यात झाली असून गेल्या 24 तासात पाच अंशांनी तापमान घसरल आहे. जळगावात आज सकाळी 10.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

Weather Update: अवकाळी पावसाच्या सरी आता ओसरला असून तापमानात लक्षणीय घट जाणवू लागली आहे. देशभरात थंडीची चाहूल लागली आहे. हवेत गारवा वाढू लागलाय. पुढील काही दिवसात संपूर्ण भारतात रात्रीचे तापमान दोन ते पाच अंशांनी कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान वेगाने घसरू लागलंय. मध्य महाराष्ट्र ,मराठवाड्यासह विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसात किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या आजच्या ताज्या अहवालानुसार, मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे पहाटे गारठले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12.8 अंश सेल्सिअस तर बीडमध्ये 11.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
महाराष्ट्रात सर्वाधिक किमान तापमानाची घट जळगाव जिल्ह्यात झाली असून गेल्या 24 तासात पाच अंशांनी तापमान घसरल आहे. जळगावात आज सकाळी 10.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
हवामान खात्याचा अंदाज काय?
हवामान खात्याचा अंदाजानुसार पर्वती भागात होणाऱ्या बर्फदृष्टीमुळे वायव्य आणि लगतच्या मध्य भारतावर कोरडे व थंड वारे येऊ लागले आहेत. पुढील सहा ते सात दिवसात वायव्य आणि लगतच्या मध्य भारतात रात्रीचे तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत 2 ते 5 अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे. राजस्थान व लगतच्या काही भागात आता थंडी चांगलीच वाढली आहे. तर दक्षिणेकडे अजूनही तमिळनाडू केरळ राज्यांमध्ये पावसाच्या शक्यता कायम आहेत. मध्य भारत आणि उत्तरेकडील मैदानी भाग वगळता देशातील उर्वरित भागांमध्ये पुढील आठवड्यात तापमान घटेल.
महाराष्ट्रात कुठे किती होता पारा?
अहमदनगर – 12.5°
छत्रपती संभाजीनगर – 12.8°
बीड – 11.8°
दहाणू – 17.6°
जळगाव – 10.5°
जेऊर – 10.0°
कोल्हापूर – 18.7°
महाबळेश्वर – 12.8°
मालेगाव – 14.0°
मुंबई (कोलाबा) – 22.4°
मुंबई (सांताक्रूझ) – 19.6°
नाशिक – 12.5°
धाराशिव – 15.0°
परभणी – 13.6°
रत्नागिरी – 20.6°
सांगली – 16.9°
सातारा – 14.5°
सोलापूर – 15.6°
उदगीर – 14.8°
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे.
























