Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यभर पावसाची हजेरी, पुढील 24 तासांत मुंबईत धो धो, 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार
Mumbai Maharashtra Rain Update : उशिरा का होईना, पण महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरुवात झाली आहे.
Mumbai Maharashtra Rain Update : उशिरा का होईना, पण महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात धुंवाधार पाऊस झाला. काही दिवस वातावरणात उकाडा जाणवत होता त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
पुढील 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा. पुढील तीन ते चार तासात रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील पुढील चार तासात जोरदार पावसाचा इशारा वर्तवला आहे. त्यासोबतच रत्नागिरीतील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार
पुढच्या 2 दिवसात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी स्थिती अनुकुल आहे. आज अलिबागपर्यंत मान्सून आला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात राज्यात धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही भागाला यलो अलर्ट दिला आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर पुणे सातारा नाशिकमध्येही मुसऴधार ते अती मुसऴधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील, असे हवमान विभागाने सांगितलेय. विदर्भात पावसामुळे कमाल तापमानात २४ तासात मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी 8-10 अंशाने तापमान खाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
24 Jun: राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता. ☔☔🌧
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2023
🔸कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸पुणे सातारा नाशिक ही मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील.@RMC_Mumbai@imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/Jizm22NeKx
मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस
मुंबईत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री चांगला पाऊस झालयानंतर सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचं चित्र स्पष्ट होणार आहे. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुण्यात ऊन पावसाचा खेळ...
पुण्यात काही परिसरात मुसळधार तर काही परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. वारजे, शिवणे परिसरात मुसळधार तर कात्रज, कोंढवा, कोथरुड, स्वारगेट, नांदेड सिटी , सातारा रोड, धायरी, सिंंहगड रोड परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (24 जून) मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर 25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील काही परिसरात हलक्या सरीचा पाऊस सुरु असून बाणेर, पाषाण परिसरात ऊन आहे. मात्र उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवी मुंबई , पनवेल मध्ये पावूसाची रिपरिप सुरू
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळपासून पावसाने हजेरी लावली. सुट्टीचा दिवस असल्यानं नागरिकांकडून पावसाचं स्वागत .
पालघर-पालघर जिल्ह्यात पावसाच्या सरी
पालघर जिल्ह्याच्या विविध भागात आज वरून राजाने हजेरी लावली असून बळीराजासह नागरिक ही सुखावले आहेत. तर अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत.
विदर्भात पावसाची हजेरी -
विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात कापूस लागवडीला आजपासून सुरुवात झाली. विदर्भात मॅान्सूनचे आगमन झाले असून अनेक जिल्ह्यात काल पावसाने दमदार हजेरी लावल्याने त्यामुळे विदर्भाच्या बऱ्याच भागात खरीप पेरणीला गती मिळाली आहे. काल पडलेल्या पावसामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात कापूस लागलडीला आज पासून सुरवात झाली. पाऊस उशीरा आल्याने लांबलेल्या पेरण्या उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापेल असा अंदाज नागपूर वेध शाळेने व्यक्त केला. 25 ते 27 जून विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोल्हापुरात पावसाची भुरभुर
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू झाली. पावसामुळे बळीराजा सुखावला. शहरातही सुखद गारवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसामुळे बळीराजा सुखावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर मान्सूनच्याधारा कोसळत असून बळीराजा सुखावला आहे. यावर्षी पावसाने मृग नक्षत्र पहिल्यांदाच कोरडे घालवले. मात्र काल सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आणि जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना आणि भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस पडत असल्याने दिलासा मिळाला आहे. पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जिल्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, मालवण तालुक्यात पाऊस पडत आहे. चिपळूणमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी, २ दिवस पडत असलेल्या पावसामूळे बळीराजा सुखावला असून दिलासा मिळाला आहे...
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पोलखोल -
पहिल्याच पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. कणकवलीत चक्क या महामार्गामुळे सर्व्हिस रोडवर धबधबे वाहतानाचे चित्र दिसून आले. कणकवली येथे महामार्गावर मोठा ब्रीज बनवण्यात आला. या ब्रिजच्या कामाबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यातच पहिल्या पावसाने या ब्रिजवरून अनेक धबधबे वाहताना दिसून आले. ब्रिजवरुन पडणाऱ्या या पाण्यामुळे सर्व्हीस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अजून पावसाने हवातसा जोर धरलेला नाही, त्यातच महामार्गाची ही अवस्था त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.