Rahul Narvekar : नियम महाविकास आघाडीने बदलला अन् फायदा भाजपला झाला
Maharashtra Vidhan Sabha : महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुप्त मतदान पद्धतीमुळे मतांची फाटाफुट होऊ नये याकरिता महाविकास आघाडीने नियमात बदल केला होता.
मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आणि ते अध्यक्ष झाले. परंतु महाविकास आघाडीने खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी ज्या नियमात बदल केला, त्याचाच फायदा भाजपाला झालेला दिसतो. त्यामुळे नियम महाविकास आघाडीने बदलला आणि फायदा मात्र भाजपला झाला असं काहीसं चित्र आहे.
खुल्या पद्धतीने मतदान होऊन भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीने खेळलेल्या एका खेळीची आठवण झाली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने न होता खुल्या पद्धतीने व्हावी यासाठी महाविकास आघाडीने आग्रह धरत नियमात बदल केले आणि त्याचा फायदा आज भाजपला झाला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात याच गुप्त मतदान पद्धतीमुळे मतांची फाटाफुट होऊ नये याकरिता विधानसभा नियम 6 मध्ये सुधारणा करण्याकरिता पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल दिल्यानंतर विधानसभा नियम समितीने अहवालावर चर्चा करुन हा अहवाल मे 2021 मध्ये मंजूर केला. त्याला सभागृहाने मागच्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी दिली होती.
खरंतर महाविकास आघाडीचा उमेदवार विधानसभा अध्यक्ष व्हावा म्हणून खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी नियम बदलले. परंतु हेच नियम आता भाजप आणि शिंदे गटासाठी फायदेशीर ठरले आहेत. अर्थात या प्रकरणात दोन्ही बाजूने विविध देखील बजावण्यात आले आहेत त्यामुळे ही लढाई कोर्टातही सुरू राहील.
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.