भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
Maharashtra Rain : गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तर रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या गोंदियाकरांना आज पावसाने (Rain) दिलासा दिला आहे. यामुळे तापलेल्या वातावरणातील दाह कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून गोंदिया (Gondia) जिल्ह्याचा तापमान सातत्याने वाढत होता. आज देखील गोंदिया जिल्ह्यात दुपारी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. मात्र, सायंकाळी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
दिवसभर प्रचंड उकाडा असताना आज सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, त्याशिवाय शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. यात चिचोली ते नाकाडोंगरी परिसरात असलेल्या जंगलव्याप्त भागातील अनेक वृक्ष उन्मळून रस्त्यावर कोसळले आहेत. यामुळं वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी गावाला बसला असून यामुळे भातपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, जोरदार वादळामुळं रात्री दहा पर्यंत वीज पुरवठा खंडित होता.
विदर्भ तापला, उकाड्याने माणसासह प्राणी-पक्षीही हैराण
सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरु असून काल ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये देखील 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रालयात प्राण्यांना आणि पक्षांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी विशष काळजी घेतली जात आहे. प्राणी संग्रालयातील बिबट, अस्वल, माकड, मोर यांच्या पिंजऱ्यात कुकर लावण्यात आले. वाघांसाठी पाण्याचे विशेष डबके तयार करण्यात आले असून वरच्यावर पाण्याचा फवारा करून परिसर थंड ठेवला जात आहे . सोबतच प्राण्यांच्या आहारावर देखील विशेष लक्ष दिले जात आहे.
उष्णतेच्या लाटेनंतर चंद्रपुरात पाऊस बरसला
उष्णतेच्या सलग आठवड्याभराच्या लाटेनंतर चंद्रपुरात सोमवारी संध्याकाळी अचानक पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने वातावरण दमट झाले होते. राज्यभर अवकाळी पावसाची हजेरी अनुभवली जात असताना चंद्रपूर शहरात मात्र तापमान वाढ झाल्याचं दिसत होत. अशातच सोमवारी सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने नागरिकांची मात्र त्रेधा उडाली. विशेष ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर या दोन्ही शहरात सोमवारी मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले.