(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugar industry : साखर उद्योगातील अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीसांनी घेतली सहकारमंत्री अमित शाह यांची भेट, केल्या 'या' मागण्या
साखर उद्योगासमोर (sugar industry)असणाऱ्या अडचणी आणि या उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Sugar industry : ऊस उद्योगाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा (Cooperation Minister Amit Shah) यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली. साखर उद्योगासमोर (sugar industry)असणाऱ्या अडचणी आणि या उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भातील सकारात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. यावर पुढच्या आठवडाभरातच सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच साखरेचा निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी देखील केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली.
साखर उद्योग सक्षम व्हावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे या दृष्टीकोनातून अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचे शिंदे म्हणाले. या बैठकीला केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्माजी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजामुंडे, खासादर रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार सुजय विखे, खासादर धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
साखरेचा निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी : देवेंद्र फडणवीस
साखर उद्योगांचे खेळते भांडवल, कर्ज पुनर्रचना, आयकराचे विषय, को-जनरेशन इत्यादी अनेक विषयांवर आणि एकूणच साखर उद्योगांच्या अडचणी आणि उद्योगाचे सशक्तीकरण यावर चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन सहकारमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले. साखरेचा निर्यात कोटा हा वापरला गेला असल्यानं हा कोटा वाढवून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. त्यावर योग्य आणि सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणावर आज चर्चा झाली. 20 विविध मुद्यांवर त्यांना काम करण्याची आता संधी मिळेल. त्यामुळं कृषी व्यवसाय संस्था म्हणून त्यांना काम करता येईल. यातून ग्रामीण भागात सहकार बळकट होईल. यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, अशी सूचना अमित शाह यांनी केल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यातील सहकारी तत्वावर चालणारे साखर कारखाने आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: