Voter Registration : मतदार यादीत नाव नाही?; टेन्शन घेऊ नका, आता मोबाईलवरून करा नोंदणी
Voter Registration : भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे.
Voter Registration : भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही अधिकाराला धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. पण 18 वर्ष पूर्ण झालेले अनेकजण मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वचिंत राहतात. यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मोबईल ॲपची निर्मिती केली आहे. या मोबाईलॲपमुळे 18 वर्ष पूर्ण झालेले नागरिक आपलं नाव मतदार यादीत थेट नोंदवू शकतात. यासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही. राज्य निवडणूक आयोगानं ट्रू-व्होटर मोबाईल ॲप आणलं आहे. या ॲपद्वारे मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधेसह इतरही महत्वाची माहिती मिळणार आहे.
ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. यावेळी बोलताना मदान म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. त्यात आता मतदार नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात आली आहे. त्यातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी होईल. मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येईल.
भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित किंवा नावांत अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही आता करावा, असे मदान यांनी सांगितले.